उदयनराजेंविरोधात राष्ट्रवादीचे तिकीट यांना; पवार रविवारी देणार 'ग्रीन सिग्नल' 

NCP
NCP

कऱ्हाड : सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक होणार असल्यामुळे उदयनराजे यांच्या विरोधात माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचेही नाव चर्चेत असले तरी त्यांनी कऱ्हाड दक्षिण विधानसभा रिंगणामध्ये उतरण्यास इच्छुक असल्याचे स्पष्ट केलेले आहे.

सातारा मतदारसंघ हा राष्ट्रवादीकडे असल्याने श्रीनिवास पाटील यांच्या नावावर एकमत होण्याची चिन्हे राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडून "ग्रीन सिग्नल' दिल्याशिवाय पाटील मात्र, त्यावर काहीही बोलणार नाहीत, असे दिसते. 

उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादीला रामराम करून भाजपवासी झाले. त्यापूर्वी त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे सातारा लोकसभा निवडणुकीची पोटनिवडणूक विधानसभेसोबत होणार हे स्पष्ट झाले. भाजपच्या महाजनादेश यात्रेसाठी आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदयनराजेंना विक्रमी मताधिक्‍याने निवडून देण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे उदयनराजेंच्या विरोधातील उमेदवार कोण, याबाबत उत्सुकता शिगेला पोचली आहे. माजी मुख्यमंत्री आमदार चव्हाणांचे नाव आघाडीवर आहे. मात्र, आमदार चव्हाण कऱ्हाड दक्षिण मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे सांगून लोकसभेसाठी रस नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यातच सातारा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असल्याने तो कॉंग्रेसला सोडणार का, हाही यानिमित्ताने प्रश्‍न निर्माण होत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच या मतदारसंघात उमेदवार देण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. उदयनराजेंना तुल्यबळ उमेदवार द्यायचा झाल्यास सध्या श्रीनिवास पाटील यांच्या नावाची चर्चा अधिक आहे. दहा वर्षे खासदार म्हणून प्रभावी कामगिरी व त्यानंतर सिक्कीमचे राज्यपाल म्हणून त्यांनी उमटवलेल्या कामाचा शिक्का हे त्यांच्या लोकप्रियतेचे गमक आहे. कऱ्हाड, पाटण तालुक्‍यांतील उमेदवारच चुरशीची लढत देईल, असे अनेकांचे मत आहे. त्यात श्रीनिवास पाटील यांना अधिक पसंती दिसून येते. प्रकृतीच्या कारणास्तव काही दिवसांपासून सार्वजनिक कार्यक्रमात सक्रिय नसणारे श्रीनिवास पाटील काही दिवसांपासून बाहेर पडले आहेत. 

क्रिएटिव्ह कऱ्हाडकर ग्रुपने आयोजित केलेल्या क्षणबद्ध छायाचित्र प्रदर्शनाला भेट देणे असो, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती कार्यक्रम, सातारा येथील मी पदवीधरचा कार्यक्रम तसेच ज्येष्ठ नेते (कै.) पी. डी. पाटील यांच्या स्मृतिदिनी अभिवादन करण्यासाठीची त्यांची उपस्थितीही महत्त्वाची मानली जाते. त्यांच्या सक्रिय होण्याने नवीन राजकीय जुळवाजुळव होण्याची शक्‍यता आहे. श्री. पाटील यांनाही अनेकजण स्पष्टपणे उमेदवारीबाबत विचारत आहेत. मात्र, शरद पवार यांच्या आदेशानंतरच त्यावर बोलणे योग्य होईल, असे त्यांचे सांगणे आहे. त्यामुळे पाटील सक्रिय झाल्याने त्यांच्याकडून तयारी सुरू झाल्याचे दिसून येत आहे. भोसले यांच्याबद्दलची कऱ्हाड, पाटणमधील नाराजी थोपवून लोकसभेवेळी आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार बाळासाहेब पाटील यांनी मेहनत घेतल्याने कऱ्हाड, पाटणचा बुरूज राखण्यात यश मिळवले. मात्र, अगोदरच नाराजी व त्यात चार महिन्यांत राजीनामा देवून पुन्हा निवडणूक लादली गेल्याची भावना लोकांत आहे. त्यामुळे लोकसभेच्या पोटनिवडणुकसाठी कऱ्हाड दक्षिण, कऱ्हाड उत्तर व पाटण या मतदारसंघाची भूमिका निर्णायक ठरणार, हे नक्की. 

रविवारी चित्र स्पष्ट होण्याची शक्‍यता 
दरम्यान, ज्येष्ठ नेते शरद पवार हे येत्या रविवारी (ता. 22) सातारा दौऱ्यावर असल्यामुळे त्यावेळी सातारा जिल्ह्यातील विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारीवर चर्चा होण्याची शक्‍यता असून, त्यानंतर चित्र स्पष्ट होईल, असे बोलले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com