
या बंदमुळे लांब पल्ल्यासह स्थानिक बसेस अडकल्याने प्रवाशांची गैरसोय झाली.
निपाणी : कर्नाटक राज्य परिवहनच्या एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी नोकरीत सामावून घ्यावे, सरकारी नोकराप्रमाणे सोयी-सुविधा पुरवाव्यात, या मागण्यांसाठी शनिवारी (12) परिवहनच्या निपाणी आगारातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन छेडले. रविवारी (13) दुसऱ्या दिवशी आंदोलन सुरू असल्याने शहर व ग्रामीण भागातील बससेवा ठप्प झाली. परिणामी प्रवाशांचे हाल झाले. या आंदोलनामुळे निपाणी आगाराला दोन दिवसांत निपाणी आगाराला 16 लाखांचा फटका बसला.
बंगळूरमध्ये परिवहनच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाला प्रतिसाद देत निपाणी आगारातही दोन दिवस काम बंद आंदोलन छेडले. या बंदमुळे लांब पल्ल्यासह स्थानिक बसेस अडकल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. निपाणी बसस्थानकात पोलिस बंदोबस्त ठेवला होता.
हेही वाचा - बेळगावात यंदा सायकली वितरणापासून विद्यार्थी राहणार वंचित -
विविध मागण्यांसाठी परिवहनच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी छेडलेले आंदोलन रविवारीही सुरुच होते. त्यामुळे चिक्कोडी विभागातील निपाणी, चिक्कोडी, संकेश्वर, गोकाक, रायबाग, अथणी आगारांतील बससेवा बंदच राहिली. निपाणीतून दररोज 98 हून अधिक बस विविध मार्गांवर धावतात. बंदमुळे सर्व बस बंद राहिल्याने शहराकडे येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली. या बंदमध्ये आगारातील 376 चालक-वाहक सहभागी झाले होते.
महाराष्ट्र बससेवा बाहेरून
कर्नाटकातील परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारपासून संप पुकारला आहे. त्यामुळे निपाणी आगारातील कर्मचाऱ्यांनी शनिवारी पहाटेपासूनच बंदला पाठिंबा देण्यासाठी काम बंद आंदोलन केले. दोन दिवस हे आंदोलन सुरुच राहिल्याने महाराष्ट्र राज्य परिवहनने महाराष्ट्रात विविध ठिकाणी जाणाऱ्या महामार्गाबाहेरून सोडल्या होत्या.
वडापला गर्दी
दोन दिवस बससेवा बंद असल्यामुळे खासगी वडापचालकांची चलती होती. निपाणी-बेळगाव मार्गावर 78 रुपये बस तिकीट आहे. मात्र खासगी वडापधारकाकडून 200 ते 300 रुपये उकळले जात होते. त्यामुळे बसस्थानक परिसरात वडाप संख्या जास्त दिसत होती.
हेही वाचा - लग्न जमवण्याचा नवा ट्रेंड ; व्हाट्सऍपवर जुळताहेत रेशीमगाठी -
"आंदोलनामुळे दोन दिवस बससेवा ठप्प झाली आहे. त्याचा प्रवाशांना फटका बसत आहे. लवकरच आंदोलनावर निर्णय होऊन बससेवा सुरु लवकर सुरु करण्याचा प्रयत्न चालविला आहे."
- मंजुनाथ हडपद, आगार व्यवस्थापक, निपाणी
संपादन - स्नेहल कदम