"लालपरी' आता चक्क मालवाहतुकीसाठी सज्ज : प्रवाशांच्या सेवेबरोबर शेतकरी, कारखानदारांच्या सेवेत एसटी 

st bus.png
st bus.png

सांगली-"प्रवाशांच्या सेवेसाठी' हे ब्रीदवाक्‍य घेऊन धावणारी एसटी आता प्रवाशांबरोबरच शेतकरी, व्यापारी, कारखानदार यांचा माल घेऊन देखील धावणार आहे. त्यासाठी एसटीने मालवाहतूक ट्रक तयार ठेवलेत. "कोरोना' मुळे एसटी महामंडळासमोर मोठे संकट उभे राहिले असून त्यातून बाहेर पडण्यासाठी मालवाहतुकीसाठी "लालपरी' सज्ज झाली आहे. 


राज्यात "कोरोना' चा शिरकाव झाल्यानंतर 14 मार्चपासून एसटी च्या फेऱ्या कमी-कमी करण्यात आल्या. 24 मार्चपासून "लॉकडाउन' जाहीर केल्यानंतर एसटी च्या सर्वच फेऱ्या बंद करण्यात आल्या. प्रत्येक आगारात पाच टक्के कर्मचारी कार्यरत ठेवले. एक मार्च ते 30 एप्रिल अखेर एसटी महामंडळाने "भारमान वाढवा' अभियान सुरू केले होते. परंतू लॉकडाउनचा मोठा फटका सहन करावा लागला. भारमान वाढवा अभियानाच्या काळातच एसटी जागेवर थांबली. लॉकडाउनमध्ये एसटी बसेसच्या फेऱ्या रद्द केल्यामुळे प्रत्येक आगाराला कोट्यवधी रूपयाचे नुकसान सहन करावे लागले. 


लॉकडाउन शिथील केल्यानंतर 22 मे पासून एसटी धावू लागली आहे. परंतू कोरोनामुळे आसन क्षमता निम्मीच ठेवण्याचे आदेश दिले आहेत. एका सीटवर एकच प्रवासी याप्रमाणे 22 ते 25 प्रवासी नेले जातात. तसेच प्रवासी भाडे देखील पूर्वीप्रमाणेच असल्यामुळे सध्या एसटी पुन्हा तोट्यातच धावू लागली आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्‍य एसटी ने सार्थ ठरवले असले तरी झालेला तोटा भरून काढण्याचे महामंडळासमोर आव्हान उभे राहिले आहे. 


दोन महिन्याच्या प्रचंड नुकसानीनंतर तसेच आगामी काळातील तोटा गृहीत धरून एसटी पुन्हा फायद्यात आणण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत. त्यातूनच प्रवाशांच्या सेवेबरोबर आता शेतकरी, व्यापारी, लघु उद्योजक व मोठे कारखानदार यांचा माल राज्यात कोठेही पोहोचवण्यासाठी "लालपरी' धावणार आहे. एसटीच्या वर्कशॉपमध्ये आसने नसलेले ट्रक असतात. अशा ट्रकचा मालवाहतुकीसाठी उपयोग केला जाणार आहे. एक एसटी बसमधून साधारण नऊ टन इतका माल वाहून नेला जाऊ शकतो. माफक दरात सुरक्षितपणे माल वाहतूक करण्यासाठी एसटी महामंडळाने ही सुविधा प्रथमच देऊ केली आहे. 24 तास ही सेवा असणार असून त्यासाठी एसटी बसेस निर्जंतुकीकरण केल्या जाणार आहेत. तसेच माल वाहतुकीसाठी एसटी दारात येणार आहे. 
 

""सांगली विभागात सध्या एसटीचे दहा ट्रक मालवाहतुकीसाठी सज्ज ठेवले आहेत. प्रायोगिक तत्वावर साधारणपणे प्रती किलोमीटर 28 ते 30 रूपये इतके भाडे आकारले जाईल. तसेच 9 टन इतकी क्षमता असेल. माल वाहतुकीसाठी मागणी वाढल्यास उपलब्ध बसेसमधील आसने काढून त्याचे मालवाहतूक ट्रक बनवले जातील.'' 
-अमृता ताम्हनकर (विभाग नियंत्रक, सांगली) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com