भय इथले संपत नाही; कऱ्हाडकरांना हवी सुरक्षिततेची हमी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 एप्रिल 2020

होम क्वारंटाइन म्हणून पुणे, मुंबईहून येणाऱ्यांच्या हातावर मारला जाणारा शिक्का पुसला जात आहे. ती शाईच हलक्‍या दर्जाची आहे. ही बाब पालिका व तहसीलदार कार्यालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनीही ती मान्य केली. त्यांच्याकडे पाठपुरावा केल्याने काही प्रमाणात निवडणुकीत वापरली जाणारी शाई शिक्का मारण्यासाठी शहरातील यंत्रणेस मिळाली आहे. अजूनही जादा शाई उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा होत आहे. 
- प्रियांका यादव, उपसभापती, कऱ्हाड पालिका 

कऱ्हाड : कोरोनाचे संकट वाढत आहे. शहरात पुणे, मुंबईसह परदेशातून आलेल्यांना होम क्वारंटाइन केले जात आहे. त्या नागरिकांच्या हातावर शिक्काही मारला जात आहे. परदेशातील नागरिकांच्या हातावर मारल्या जाणाऱ्या शाईचा दर्जा चांगला आहे. मात्र, पुणे, मुंबईच्या नागरिकांच्या हातावर मारला जाणाऱ्या शिक्‍क्‍याची शाई पाण्यानेही पुसली जात आहे, अशा तक्रारी स्थानिक प्रशासनाकडे आल्या आहेत. दरम्यान तांबव्यातील 54 जणांचे रिपाेर्ट निगेटिव्ह आले असले तरी होम क्वारंटाइनच्या शिक्का पुसत जात असल्याने कराडकरांमध्ये असवस्थता निर्माण झाली आहे.
 
शिक्का पुसला की ती व्यक्ती कोठेही फिरत आहे. लोकांनाही ओळखू येत नाही. त्यामुळे शहरात त्यांच्या फिरण्याने संभाव्य धोका वाढला आहे. शिक्का मारणाऱ्या यंत्रणेला निवडणुकीत वापरण्यासाठीची शाई पुरवली जात नाही. त्याचा तुटवडा असल्याने त्या यंत्रणेला साध्या शाईवर अवलंबून राहावे लागत आहे. शिक्का मारणाऱ्या, सर्व्हे करणाऱ्यांना सरसकट निवडणुकीत वापरली जाणारी मार्कर शाई देण्याची गरज आहे.
 
शहरात सध्या 700 नागरिकांना होम क्वारंटाइन केले आहे. त्यातील 33 नागरिक परदेशातून आले आहेत. त्या सगळ्याच नागरिकांच्या हातावर क्वारंटाइनचा शिक्का मारण्याचे आदेश आहेत. त्यातील परदेशवारी करणाऱ्या 33 नागरिकांच्या हातावर सुरवातीला शिक्के मारले. त्यांच्यासाठी वापरण्यात आलेली शाई निवडणुकीत वापरली जाणारी होती. मात्र, कोरोनाचे संकट वाढल्याने आता पुणे, मुंबईहून आलेल्या नागरिकांनाही शिक्के मारण्याचे आदेश झाले. कमी-अधिक फरकाने पुणे, मुंबईहून जिल्ह्यात आलेल्यांची संख्या मोठी आहे. त्यांच्या हातावर शिक्का मारण्यासाठी वापरली जाणारी शाई मात्र साधी आहे. त्याचा दर्जा तितकासा चांगला नाही. निवडणुकीत वापरली जाणारी शाई त्यांना पुरवणे अपेक्षित होते. मात्र, ती शाई बाजारात सध्या उपलब्ध नसल्याने साधी शाई वापरली जात आहे. लॉकडाऊनमुळे शासनाला त्या शाईची कमतरता भासते आहे. त्यामुळे साधी मात्र त्यातल्या त्यात चांगल्या दर्जाची शाई वापरली जात आहे. पण, त्याचा फारसा उपयोग होताना दिसत नाही. सकाळी मारलेली शाई सायंकाळी तोंड, हातपाय धुताना निघून जात आहे. शिवाजी हाउसिंग सोसायटीत होम क्वारंटाइन झालेल्या सहा लोकांनी तशा तक्रारी स्थानिक प्रशासनाकडे दिल्या आहेत.

त्या दोन पॉझिटिव्ह रुग्णांचे आज पुन्हा नमुने पाठविले जाणार; जावळीत चिंता,जिल्ह्यात 11 संशयित नव्याने दाखल
 
ही बाब पालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती प्रियांका यादव यांच्या लक्षात आली. त्यानंतर सौ. यादव, प्रीतम यादव यांनी ती गोष्ट शासनाच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर त्यांना काही प्रमाणात शाई उपलब्ध झाली आहे. दरम्यान, शाई पुसली जात असल्याच्या तक्रारी आल्यानंतर तहसीलदार कार्यालयातून निवडणुकीत वापरली जाणाऱ्या शाईच्या दहा मिलीलिटरच्या लहान बाटल्या नागरी सुविधा केंद्रात आज उपलब्ध झाल्या आहेत. जितक्‍या व्यक्तींना शिक्के मारायचे आहेत, त्या तुलनेत त्यांना पुरवण्यात आलेली शाई अत्यंत तोकडी आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stamps Of Home Quarantine Should Be Dark Says Karad Citizens