स्थायी समितीला मुदतवाढीने आठ सदस्यांना मिळाली संधी 

बलराज पवार 
Tuesday, 1 September 2020

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या स्थायी समितीला मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे सभापतींसह आठ सदस्यांना दिलासा मिळाला.

सांगली : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या स्थायी समितीला मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे सभापतींसह आठ सदस्यांना दिलासा मिळाला. आयुक्त नितीन कापडणीस यांनी स्थायी समितीच्या आजच्या ऑनलाईन सभेत ही माहिती दिली. पुढील आदेशापर्यंत मुदतवाढ दिल्याचे लेखी आदेश शासनाने दिल्याचे त्यांनी सांगितले. 

स्थायी समितीची मुदत आज संपली. त्यामुळे सभापती संदीप आवटी यांच्यासह आठ सदस्यांना बाहेर पडावे लागणार होते. मात्र सध्या तरी त्यांना मुदतवाढीने संधी मिळाली आहे. यामुळे भाजपचे संदीप आवटी, गणेश माळी, लक्ष्मण नवलाई, भारती दिगडे, अजिंक्‍य पाटील आणि कॉंग्रेसचे अभिजित भोसले, मनोज सरगर तर राष्ट्रवादीचे योगेंद्र थोरात यांना लॉटरी लागली आहे. 

स्थायीचे सदस्य अभिजित भोसले, योगेंद्र थोरात यांनी, समितीची मुदत संपली का? असे विचारले. यावर आयुक्त कापडनीस म्हणाले, कायद्यानुसार 31 ऑगस्ट रोजी सभापतींसह आठ सदस्यांची मुदत संपणार आहे. परंतु कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारी म्हणून नगरविकास मंत्रालयाने नवीन नियुक्ती, निवडीला बंदी केली आहे. पुढील आदेश येईपर्यंत याच सदस्य, समित्या कार्यरत ठेवून काम करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. 
स्थायीच्या आजच्या सभेत शहरातील 100, 80 तसेच 50 फुटी रस्त्याच्या कडेला वृक्ष लागवडीसाठी 35 लाख रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरीचा विषय होता. त्याला स्थगिती देण्यात आली.

सभापती आवटी म्हणाले, सदस्यांनी वृक्ष लागवड कोठे करणार? असा सवाल उपस्थित केला. वृक्षलागवड न होताच किंवा लावूनही त्याची देखभाल-दुरुस्ती न करताच बिले काढली जातात असा अनुभव आहे. यामुळे वृक्ष लागवड आणि देखरेखीसाठी नगरसेवकांची वृक्ष समिती नेमली जाईल. त्यांच्या निदर्शनाखालीच लागवडचा निर्णय घेतला जाईल. तोवर हा विषय स्थगित ठेवला. 

ऐनवेळच्या विषयाला भाजपचा विरोध 
मिरजेला 100 बेडचे हॉस्पिटल उभारणे आणि कोरोना हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांच्या पगाराचा विषय ऐनवेळी आणण्यात आला. मात्र भाजपच्या सदस्यांनी ऐनवेळच्या विषयाचा कारभार करणार नाही, असा पवित्रा घेत त्याला विरोध केला. योगेंद्र थोरात यांनी, पगाराअभावी कोरोना हॉस्पिटलचे कर्मचारी काम सोडून गेले तर जबाबदार कोण? कोरोनात हा विषय अत्यावश्‍यक असल्याने सभापती आणि आयुक्तांनी हा निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. परंतु सभापती आवटी यांनी पुढील सभेत हा निर्णय घेऊ, असे स्पष्ट केले. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Standing Committee got an extension