
कोरोना काळात दीर्घकाळ शाळा बंद होत्या. आता 27 जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू होणार आहे. कोरोनाची खबरदारी घेऊन सर्व शाळा सज्ज ठेवा, अशा सूचना शिक्षण सभापती आशा पाटील यांनी आज शिक्षण समिती बैठकीत दिल्या.
सांगली : कोरोना काळात दीर्घकाळ शाळा बंद होत्या. आता 27 जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू होणार आहे. कोरोनाची खबरदारी घेऊन सर्व शाळा सज्ज ठेवा, अशा सूचना शिक्षण सभापती आशा पाटील यांनी आज शिक्षण समिती बैठकीत दिल्या.
आशा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. इयत्ता 5 वी ते 8 वी वर्ग सुरू करण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे. सॅनिटायझरचा वापर, सुरक्षित अंतर, अन्य आरोग्य विषयक दक्षता घेऊन वर्ग सुरू करावेत. पूर्ण खबरदारी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या. कोरोना कालावधीत जिल्ह्यातील शाळांना सुटी असताना शाळेत जे 50 टक्के शिक्षक उपस्थित होते त्यातील काही शाळेच्या शिक्षकांची रेकॉर्ड अद्ययावत करण्याचे काम उत्तम झाले आहे. त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
शाळेतील शिक्षकांच्या 50 टक्के उपस्थितीबाबत गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी यांच्या भेटीचे नियोजन करण्याचे ठरले, तर 50 टक्के शिक्षक पूर्ण वेळ शाळेत राहतील, याची दक्षता घेण्याबाबत चर्चा झाली. शासकीय योजनांच्या कामासाठी शाळेच्या जागेचे हस्तांतरण न करता काही दिवसांच्या वापरासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्याचे ठरले.
जिल्ह्यातील 141 मॉडेल स्कूलची यादी प्रसिद्ध करण्यात आली. जिल्ह्यातील प्रत्येक शाळेला विना बॅटरी सोलर सिस्टीम बसविण्याचे ठरले. शिक्षकांच्या निवृत्ती नंतरचे सर्व आर्थिक लाभ वेळेत देण्यात यावेत, अशी सूचना सभापतींनी केली. शिक्षकांचे वेतन वेळेवर करण्यात यावेत, असेही आदेश दिले. शाळा खोल्या बांधकाम व दुरुस्तीची कामे निश्चित करून जिल्हा नियोजन समितीकडे शिफारस करण्याबाबत ठराव करण्यात आला. सन 2021 मधील जिल्हा परिषद शाळांच्या जाहीर करावयाची सुट्यांची यादी निश्चित करून ती शाळांना कळविण्याबाबत ठराव झाला.
संपादन : प्रफुल्ल सुतार