खुल्या वातावरणातील जीम सुरू; बंदिस्त जीम "लॉक'च

घनश्‍याम नवाथे 
शुक्रवार, 31 जुलै 2020

राज्य सरकारने रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेत बंदिस्त जीम खुली राहणार नाही. त्याऐवजी खुल्या वातावरणातील जीम सुरू राहतील असे तातडीने जाहीर केले आहे.

सांगली : केंद्र सरकारने "अनलॉक 3' च्या मार्गदर्शक सूचना बुधवारी जाहीर करताना पाच ऑगस्टपासून जीम खुली करण्यास परवानगी दिली. मात्र राज्य सरकारने रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेत बंदिस्त जीम खुली राहणार नाही. त्याऐवजी खुल्या वातावरणातील जीम सुरू राहतील असे तातडीने जाहीर केले आहे. त्यामुळे गेले चार महिने राज्यात "लॉक' असलेल्या जीम पुन्हा खुल्या होण्यासाठीचा काळ आणखी लांबला आहे. 

केंद्र सरकारने मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर "लॉकडाउन' जाहीर केले. त्याचबरोबर अनेकांना व्यवसाय व उद्योग "लॉक' करावे लागले. त्यामध्ये देशभरातील जीम देखील बंद झाल्या. तेथील नेहमीचा खणखणाट थांबला. कोरोनाच्या संकटात नागरिक तंदुरूस्त राहण्यासाठी जीम सुरू ठेवाव्यात. त्यासाठी सोशल डिस्टन्सिंग व प्रतिबंधात्मक उपाय योजना करू अशी जीम चालकांनी मागणी केली. लोकप्रतिनिधींमार्फत शासनाकडे रेटा लावला. परंतू शासनाने परवानगी दिली नाही. "लॉकडाउन' नंतर शासनाने "अनलॉक' चा टप्पा जाहीर केला. तेव्हाही जीम चालकांच्या मागणीवर विचार झाला नाही. देशपातळीवर सर्व जीम चालकांनी आंदोलन केले. त्याचाही परिणाम झाला नाही. 

केंद्र शासनाने "अनलॉक 3' बाबत बुधवारी मार्गदर्शक सूचना जारी केल्या. त्यामध्ये पाच ऑगस्टपासून जीम व योगा सुरू राहील असे जाहीर केले. केंद्र सरकारने जीम खुली करण्यास परवानगी दिल्यानंतर राज्यभरातील जीम चालक आनंदीत झाले होते. परंतू त्यांचा आनंद फार काळ टिकला नाही. 

राज्य सरकारने महाराष्ट्रात बंदिस्त जीम खुली राहणार नसल्याचे जाहीर केले. राज्यात रूग्ण वाढत असल्यामुळे खुल्या वातावरणातील मल्लखांब, बॅडमिंटन, टेनिस व जीम तेवढ्या सुरू राहतील असे स्पष्ट केले. त्यामुळे अनेक इनडोअर जीम चालकांनी एकमेकाकडे विचारणा करून खात्री केली. अखेर बंदिस्त जीम सध्यातरी खुली करता येणार नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे चार महिन्याची प्रतिक्षा संपल्यानंतर ती आणखी किती काळ लांबणार? असा प्रश्‍न विचारला जात आहे. 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Start outdoor gym; Locked Jim "Lock'ch