
बेळगाव : जनावरांसाठी फिरते दवाखाने सुरु
बेळगाव - १०८ रुग्णवाहिकेच्या धर्तीवर पशुसंगोपन खात्यानेही आता जनावरांसाठी १९६२ हेल्पलाईन क्रमांक असलेले फिरते दवाखाने (रुग्णवाहिका) सुरु केले आहेत. पहिल्या टप्प्यात बंगळूर आणि म्हैसूरमध्ये शनिवारी (ता. ७) या सेवेचे लोकार्पण झाले असून दुसऱ्या टप्प्यात बेळगाव व गुलबर्ग्यात ही सेवा सुरु केली जाणार आहे. बेळगाव जिल्ह्यासाठी एकून २७ वाहने उपलब्ध केली जाणार आहेत. आपत्कालीन वेळेत रुग्णांना तातडीचे उपचार मिळावेत, यासाठी राज्य सरकारने गेल्या काही वर्षापासून १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका सुरु केली आहे. आता याच धर्तीवर जनावरांनाही तातडीने योग्य उपचार मिळावेत, यासाठी फिरत्या रुग्णवाहिका सुरु करण्यात येणार आहेत. राज्यासाठी एकूण २७५ फिरत्या रुग्णवाहिका मंजूर झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यात म्हैसूर आणि बंगळूर विभागात रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यात गुलबर्गा आणि बेळगाव जिल्ह्यांमध्ये रुग्णवाहिका धावतील.
एखाद्या ठिकाणी जनावरावर उपचार करण्यासाठी रुग्णवाहिका हवी असल्यास संबंधितांनी १९६२ या हेल्पलाईनवर संपर्क साधल्यास अवघ्या काही वेळेतच फिरता दवाखाना सेवेसाठी दाखल होणार आहे. या रुग्णवाहिकेत एक डॉक्टर व एक कंपाउंडरसह सर्व प्रकारचे आवश्यक वैद्यकीय साहित्य उपलब्ध असेल. फिरते दवाखाने सुरु झाल्यास शेतकऱ्यांना आपल्या जनावरांवर मोफत औषधोपचार करुन घेण्यास मदत होणार आहे.
‘जनावरावर उपचार करण्यासाठी सरकार फिरते पशुवैद्यकीय दवाखाने रुग्णवाहिका सुरू करत आहे. बेळगाव जिल्ह्यासाठी २७ फिरते दवाखाने मंजूर झाले आहेत. दुसऱ्या टप्प्यात गुलबर्गा आणि बेळगाव जिल्ह्यामध्ये या सेवेचा शुभारंभ केला जाईल.’
- डॉ. ए. के. चंद्रशेखर, उपसंचालक, पशुसंगोपन खाते.