राज्य शासन देणार विद्यार्थ्यांना गृहपाठ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 एप्रिल 2020

राज्य शासनाने विद्यार्थ्यांसाठी एक खास प्लॅन आखण्याचे नियोजन केले आहे. त्याविषयी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड सर्व शिक्षणाधिकाऱ्यांशी उद्या (ता. 9) संवाद साधतील.

सांगली ः देशभरात लॉक डाऊनची स्थिती कशी राहील, याबद्दल कुणीच खात्रीने सांगू शकत नाही. यंदा शाळा जूनच्या मध्यानंतर किंवा जुलैमध्येही सुरु होऊ शकतील. तोवर तीन महिने मुले अभ्यासापासून दूर राहण्याची भिती आहे. त्यामुळे राज्य शासनाने विद्यार्थ्यांसाठी एक खास प्लॅन आखण्याचे नियोजन केले आहे. त्याविषयी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड सर्व शिक्षणाधिकाऱ्यांशी उद्या (ता. 9) संवाद साधतील. ऑनलाईन अभ्यासक्रम, टीव्हीवर प्रोजेक्‍ट अशा पद्धतीच्या काही उपाययोजना असतील, अशी प्राथमिक माहिती हाती येत आहे. त्याकडे आता पालकांचे लक्ष असेल.

महाराष्ट्रात सर्वात आधी सांगली जिल्ह्यात शाळा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय पालकमंत्री जयंत पाटील यांनी घेतला होता. त्यावेळी शहरी आणि ग्रामीण शाळाही बंद करण्यात आल्या. पुढील आठ दिवसानंतर शाळांच्या परीक्षा रद्द करण्याची घोषणा झाली आणि आठवीपर्यंतचे विद्यार्थी थेट पुढच्या वर्गात जातील, असा निर्णय जाहीर झाला. नववी आणि अकरावीच्या परीक्षाही रद्द झाल्या आहेत.

दहावीचा उर्वरीत एक पेपर कधी होईल, हेही निश्‍चित नाही. या पार्श्‍वभूमीवर आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करून त्यांना गृहपाठ देण्याबाबत राज्य शासन विचार करत आहे. त्याचा प्राथमिक आराखडाही तयार असल्याचे सांगण्यात आले. तो लवकरच अंतिम करून मुलांच्या हाती अभ्यास असेल, असे सांगण्यात आले. उद्याच्या संवादानंतर त्यात स्पष्टता येईल.

याबाबत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी सुनंदा ठुबे म्हणाल्या, ""शाळा सुरु कधी होतील हे काहीच माहिती नाही. आम्ही सूचनांकडे लक्ष ठेवून आहोत. आम्हीच एक प्लॅन करतोय, की त्यांनी घरी अभ्यास केला पाहिजे. त्यासाठी राज्याकडून ऑडिओ, व्हिडिओ प्रोग्रॅम तयार करण्यात येत आहेत. त्याची स्पष्टता व्हिडिओ कॉन्फरन्सनंतर येईल.''
----------
 

पुढच्या वर्गाची पुस्तके

ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांनी पुढील वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याची पुस्तके मिळवली आहे. त्याचे वाचन सुरु आहे. ती समजून घेतली जात आहे. त्यामुळे मुलेही आनंदात आहेत आणि त्यांना अभ्यास मिळाल्याने पालकही समाधानी आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: state government plans home work for students