Video : सायकलीपासून चारचाकीपर्यंत वाहने बंद : जिल्हाधिकारी शेखर सिंह

Video : सायकलीपासून चारचाकीपर्यंत वाहने बंद : जिल्हाधिकारी शेखर सिंह

सातारा : कोणत्याही व्यक्तीला जिल्ह्यातील कोणत्याही रस्त्यावर गल्लोगल्ली सायकल तसेच पारंपरिक, अपारंपरिक इंधनावर चालणाऱ्या मोटारसायकल, सर्व प्रकारची तीनचाकी, चारचाकी वाहने, हलकी वाहने, मध्यम वजनाची वाहने यांचा प्रवास व वाहतूक यासाठी वापर करण्यास मनाई करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली आहे.
 
कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या अनुषंगाने कलम 144 मधील तरतुदीनुसार जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी एका वेळेस पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना जमा होण्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशामध्ये काही बदल करण्यात आला आहे, असे सांगून शेखर सिंह म्हणाले,""जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये यांनी त्यांचे सर्व विभागप्रमुख यांच्या सल्ल्याने त्यांच्या स्तरावर कर्मचारी उपस्थितीबाबत योग्य तो निर्णय घ्यावा. तथापि, कार्यालय प्रमुखांनी कार्यालयात व मुख्यालयात उपस्थित राहणे आवश्‍यक व बंधनकारक असून, आपत्ती कालावधीत जिल्हाधिकारी यांच्या वेळोवेळीच्या आदेशाप्रमाणे माहिती, सेवा व मनुष्यबळ पुरविणे कार्यालय प्रमुखावर बंधनकारक राहील. सर्व बॅंका व वित्तीय सेवा तद्‌संबंधित आस्थापना, अन्न, दूध, फळे व भाजीपाला, किरणा पुरविणाऱ्या आस्थापना, दवाखाने, वैद्यकीय केंद्रे व औषधी दुकाने व तद्‌संबंधित आस्थापना, प्रसारमाध्यमे, मीडिया व तद्‌संबंधित आस्थापना, दूरध्वनी, इंटरनेट सेवा पुरवठा करणाऱ्या आस्थापना, मोबाईल कंपनी टॉवर व तद्‌संबंधित आस्थापना, विद्युत पुरवठा, ऑईल व पेट्रोलियम व ऊर्जा संसाधने व तद्‌संबंधित आस्थापना, पिण्याचे पाणीपुरवठा व सांडपाणी निचरा करणाऱ्या आस्थापना व वरील सर्व आस्थापनांसाठी अत्यावश्‍यक असणारे वेअर हाऊस, शासकीय इन्फ्रास्ट्रक्‍चर प्रोजेक्‍ट, पशुखाद्यनिर्मिती करणारे कारखाने, आयटी आणि आयटीईएस आस्थापनांनी, अत्यावश्‍यक सेवा संबंधित वस्तू आणि मनुष्यबळ, वाहतूक करणारे ट्रक, वाहन (आवश्‍यक स्टिकर लावलेले) यांना प्रतिबंधात्मक आदेश लागू राहणार नाहीत.'' 

जिल्ह्यातील सर्व आद्योगिक क्षेत्र तसेच औद्योगिक क्षेत्राव्यतिरिक्त मोठे उद्योग, आस्थापना व कारखाने यांच्यासाठी पुढील बाबी अपवाद राहतील. औषधनिर्मिती उद्योग व टॉयलेटरी उद्योग तसेच अत्यावश्‍यक सेवा उदा. मेडिकल सेवा, इक्‍वीपमेंट पुरविण्यासाठी आवश्‍यक असलेले उद्योग. अत्यावश्‍यक सेवा तसेच या कालावधीत चालू असणाऱ्या सेवा देण्यासाठी आयटी व आयटी संबंधित उद्योग. अत्यावश्‍यक वस्तू निर्माण व सेवा पुरविणारे प्रकल्प. संरक्षण विषयक प्रकल्प. सलग उत्पादन प्रक्रिया चालू असलेल्या कारखान्याच्याबाबतीत हे आदेश निर्गमित झाल्यापासून त्वरित उत्पादन बंद करावे. औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या, काराखान्यामधील मॅन्टेनन्सचे काम पाहणारे कर्मचारी व सुरक्षारक्षक कर्मचारी यांचा समावेश आहे. कोणत्याही व्यक्तीला सातारा जिल्ह्यातील कोणत्याही रस्त्यावर गल्लोगल्ली याठिकाणी सायकल तसेच पारंपरिक, अपारंपरिक इंधनावर चालणाऱ्या मोटारसायकल, सर्व प्रकारची तीनचाकी, चारचाकी वाहने, हलकी वाहने, मध्यम वजनाची वाहने यांचा प्रवास व वाहतूक यासाठी वापर करण्यास मनाई करण्यात येत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
 
अत्यावश्‍यक सेवेतील अधिकारी, कर्मचारी, कोरोना नियंत्रणासाठी कार्यरत असणारे अधिकारी, कर्मचारी तसेच कोरोना नियंत्रणासाठी काम करणाऱ्या खासगी आस्थापना व कर्मचारी, वैद्यकीय उपचाराची गरज असलेल्या व्यक्ती व अत्यावश्‍यक सेवासुविधा देण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या व्यक्ती तथापि, वैद्यकीय उपचारासाठी गाडीमध्ये ड्रायव्हर व्यतिरिक्त एकासच प्रवास देय राहील, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. 


अत्यावश्‍यक सेवा वगळून इतरांना पेट्रोल बंद 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक म्हणून पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्यासाठी येणाऱ्या दुचाकी, चारचाकी, तीनचाकी वाहनांमध्ये पेट्रोल भरण्यास जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी मनाई केली आहे. अत्यावश्‍यक सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी, कोरोना नियंत्रण व निर्मूलनासाठी कार्य करणाऱ्या खासगी व्यक्ती, अत्यावश्‍यक वस्तू व सेवा संदर्भात कार्य करणारी खासगी व्यक्ती, वैद्यकीय उपचार किंवा सहाय्याची गरज असणारी व्यक्ती यांना सूट देण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com