
सांगली : जिल्ह्यात काम करायला प्रचंड वाव आहे. लोकांचे प्रश्न आहेत. आव्हाने आहेत, त्यावर आपण एकदिलाने आणि एकमताने मात केली तर कोण मायका लाल ? कुठला भाजप आणि कुठले कमळ जिल्ह्यात उगवणार नाही. फक्त आपण एकत्र काम करावे. लोकांची देखील तीच अपेक्षा आहे, असे प्रतिपादन सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी येथे केले.
सांगली : जिल्ह्यात काम करायला प्रचंड वाव आहे. लोकांचे प्रश्न आहेत. आव्हाने आहेत, त्यावर आपण एकदिलाने आणि एकमताने मात केली तर कोण मायका लाल ? कुठला भाजप आणि कुठले कमळ जिल्ह्यात उगवणार नाही. फक्त आपण एकत्र काम करावे. लोकांची देखील तीच अपेक्षा आहे, असे प्रतिपादन सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी येथे केले.
राज्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल डॉ. कदम यांचा आज कॉंग्रेस आणि मित्र पक्षाच्यावतीने स्टेशन चौकात जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. आमदार विक्रमसिंह सावंत, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, श्रीमती जयश्री पाटील, महापालिका विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, नामदेवराव मोहिते, स्वातंत्र्य सैनिक माधवराव माने, चंद्रकांत पोरे, कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष मंगेश चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. कदम म्हणाले,""कदम कुटुंबियांवर महाराष्ट्राने जेवढे प्रेम केले तेवढाच सन्मान सांगलीकरांनी दिला आहे. दिवगंत आर. आर. आबा पाटील, डॉ. पतंगराव कदम, मदनभाऊ पाटील यांच्या निधनाने जिल्ह्याला मोठे धक्के बसले. लोकांत अस्वस्थता होती. कॉंग्रेसचे काय होणार? अशी चिंता होती. अशा काळात माझ्यावर जबाबदारी आली आहे. पोटनिवडणुकीनंतर विधानसभेला विक्रमी मतांनी विजय झाला. निवडणूक निकालानंतर विरोधी बाकावर बसावे लागणार अशीच स्थिती होती. तेव्हा विरोधक म्हणून आक्रमकपणे प्रश्न मांडायचे असे निश्चित केले. परंतू राजकारण बदलले आणि महाविकास आघाडीची सत्ता आली. जिल्ह्यात ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यानंतर मला मंत्रीपदाची संधी मिळाली. गेली 20 वर्षे संघटीतपणे केलेले काम आणि इथल्या मातीची, डॉ. पतंगराव कदम यांची पुण्याई म्हणूनच कामाची संधी मिळाली.''
ते म्हणाले,""राज्यात मागचे सरकार झोपलेले होते. परंतू राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा निर्णय झाला. आज केंद्र सरकार सीएए कायदा आणत आहे. तो समाजातील प्रत्येक जाती-धर्मासाठी घातक आहे हे समजावून सांगण्याची वेळ आली. केंद्रातील सरकार लोकशाही मारण्याचे पाप करत आहे. सुदैवाने राज्यातील सत्तेत त्यांचे सरकार नाही. फुले-शाहू-आंबेडकरांच्या भूमीत हे कायदे मान्य नाहीत हे सांगण्याची वेळ आली आहे. राज्यात सर्वांना आवश्यक तो विकास आणि विकासकामे येथे आणली जातील. एकजुटीने काम केले तर जिल्ह्यात भाजपचे कमळ फुलणार नाही. फक्त आपण एकत्रित काम करणे आवश्यक आहे.''
विशाल पाटील म्हणाले,""दादांच्या जिल्ह्यात पतंगराव कदम यांच्यानंतर विश्वजीत सहकार मंत्रीपद मिळाले आहे. मी विश्वजीत यांना गेली 21 वर्षे जवळून पाहतो आहे. युवा कार्यकर्त्यांना घेऊन गेली अनेक वर्षे त्यांनी संघर्ष केला. त्यांच्या कष्टाला शोभेल असे पद मिळाले असून भविष्यात अजूनही मोठे पद मिळेल.''
पृथ्वीराज पाटील म्हणाले,""सांगलीतील ऐतिहासिक ठिकाणी डॉ. विश्वजीत कदम यांचा सत्कार होत आहे. त्यांच्या रूपाने विकासाचे नवे पर्व येथून सुरू होईल. कॉंग्रेस आणि मित्र पक्षासाठी हा सत्कार म्हणजे सणच म्हणावा लागेल.''
श्रीमती जयश्री पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. माजी महापौर हारूण शिकलगार, बजरंग पाटील, अजित सूर्यवंशी, बाबुराव गुरव, बाजार समिती सभापती दिनकर पाटील, आनंदराव मोहिते, महेश खराडे, मनिषा रोटे आदींसह कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे नगरसेवक, महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
विशालदादा दगड मारणे बंद करा
विशाल पाटील यांनी भाषणात डॉ. पतंगराव कदम यांचा उल्लेख जिल्ह्याला सावली देणारे वृक्ष असा केला. त्यांच्यानंतर विश्वजीत कदम यांना वृक्षाची उपमा देत वृक्षांवर काहीवेळा आम्ही दगड मारल्याची प्रांजळ कबुली दिली. आता आंब्याचा गोडवा मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली. तोच धागा पकडत विश्वजीत यांनी,""विशालदादा दगड मारणे बंद करा. तुम्ही ज्याप्रमाणे दगड मारता तो वरून थेट खाली येऊन तुम्हाला लागतो. तुम्ही मला गुरू मानलेत. माझ्याकडून शिकला असता तर बरे झाले असते. जे शिकायला हवे होते ते शिकला नाही. कदाचित कॉपी करून काहीतरी झालेले दिसते. विशालराव यापुढे एकत्र काम करू.''