चाकरमान्यांच्या पॅसेंजर गाड्यांना रेल्वेचा अजूनही रेड सिग्नल; लाखो नोकरदार, व्यावसायिकांचे हाल

प्रमोद जेरे
Wednesday, 9 December 2020

दररोज लाखो चाकरमान्यांची जीवनवाहिनी असलेल्या पॅसेंजर गाड्या सोडण्याबाबत रेल्वे प्रशासनाने लाल बावटाच दाखवण्याचे धोरण ठेवले आहे.

मिरज (जि. सांगली) ः दररोज लाखो चाकरमान्यांची जीवनवाहिनी असलेल्या पॅसेंजर गाड्या सोडण्याबाबत रेल्वे प्रशासनाने लाल बावटाच दाखवण्याचे धोरण ठेवले आहे.

साहजिकच सांगली, मिरज, कोल्हापूर, पंढरपूर, बेळगाव, कराड साताऱ्यापर्यंत अत्यल्प खर्चात जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांचे सध्या केवळ प्रवासाची साधने नसल्याने आणि प्रवास महागल्याने प्रचंड हाल होत आहेत. लाखो चाकरमान्यांच्या या मूलभूत समस्येबाबत रेल्वे प्रशासन अतिशय बेजबाबदारपणे वागत असतानाही सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सातारा जिल्ह्यांसह कर्नाटकातील नेते मंडळींही अगदी निवांत आहेत. सर्वात स्वस्त, सुरक्षित असणारी रेल्वे सुरू नसल्याने लाखो चाकरमान्यांना एसटी किंवा खासगी प्रवासी गाड्यांशिवाय पर्याय राहिलेला नाही. 

प्रवासी संघटना गप्प 
रेल्वे प्रवासी संघटनांची संख्या ढीगभर आहे. यापैकी मोजक्‍या संघटना आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा रेल्वेतील सुविधा, वेळापत्रक यासह अनेक पैलूंनी अभ्यास असला तरी पॅसेंजर गाड्या सुरू करण्यासाठी त्यांच्याकडूनही फारसे प्रयत्न झाले नाहीत. तरी रेल्वेतील मानभावी अधिकाऱ्यांकडून त्यांना प्रतिसादही मिळालेला नाही. याच प्रवासी संघटनांचा लोकप्रतिनिधींशीही समन्वय नसल्याने मागण्यांबाबत साधी चर्चाही होत नाही. 

अत्यावश्‍यक गाड्या 

  • कोल्हापूर, पुणे, पंढरपूर, परळी, बेळगाव, हुबळी, कॅसलरॉक, या मार्गावरील सर्व पॅसेंजर गाड्या 
  • प्रवाशांची अंदाजे संख्या : किमान सत्तर ते ऐंशी हजार 
  • पॅसेंजर गाड्यांचे प्रमुख लाभार्थी : खासगी नोकरदार, किरकोळ व्यापारी, शेतकरी, भाजीपाला विक्रेते, विद्यार्थी, छोटे व्यावसायिक, मिरजेला उपचारांसाठी येणारे रुग्ण 

तुलनात्मक प्रवास खर्च 

वाहन प्रकार मिरज ते कोल्हापूर मिरज ते बेळगाव मिरज ते पंढरपूर
एसटी भाडे 70 रुपये 165 रुपये 170 रुपये 
दुचाकीचा पेट्रोल खर्ज 90 रुपये 200 रुपये 200 रुपये 
पॅसेंजर रेल्वे 15 रुपये 30 रुपये 35 रुपये 
एक्‍सप्रेस रेल्वे 30 रुपये 60 रुपये 75 रुपये 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Still red signal of the railways to the passenger trains; The plight of millions of employees, professionals