कोरोना रुग्णांची हेळसांड थांबवा; दोन दिवस अल्टिमेटम - खासदार संजय पाटील 

अजित झळके
Thursday, 27 August 2020

जिल्ह्याचा संपूर्ण ताण सांगली, मिरजेवर आहे. इथली व्यवस्था कोलमडून गेली आहे. ज्यांची आर्थिक स्थिती उत्तम आहे, त्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घ्यावेत, मात्र सामान्य लोकांचीही फरफट होता कामा नये.

सांगली ः जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची प्रचंड हेळसांड सुरु आहे. सामान्य लोकांचा जीव जात आहे. आठ-आठ तास त्यांना रुग्णालय शोधायला फिरावे लागत आहे. यंत्रणा हाताबाहेर गेली आहे. या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी दोन दिवसांचा वेळ देतो, त्यानंतर मात्र आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मारून बसू, असा इशारा खासदार संजय पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिला. 

खासदार पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांची भेट घेऊन त्यांना या परिस्थितीत नवे धोरण राबवण्याची सूचना केली. त्यासाठी आवश्‍यक ती सर्व मदत देऊ, स्वयंसेवकांची फौज उभी करू, मात्र लोकांची फरफट थांबवा, असे सांगितले.

खासदार पाटील म्हणाले, ""जिल्ह्याची परिस्थिती अडचणीची झाली आहे. रुग्णांची हेळसांड सुरु आहे. बेड मिळवण्यासाठी आठ-आठ तास भटकावे लागत आहे. काही जणांना त्यात जीव गमावावा लागला आहे. माणसे दगावणे चांगले नाही. कोरोनाची प्रारंभी स्थिती आणि आता पाच महिन्यानंतरची स्थिती यात बराच फरक पडला आहे. त्यामुळे उपचाराचे नियोजन बदलावे लागेल. प्राथमिक उपचार तत्काळ सुरु झाले पाहिजे, असे सर्व तज्ज्ञ डॉक्‍टरांचे मत आहे. त्यासाठी केवळ कागदोपत्री कागद्याचे खेळ करत बसण्यापेक्षा यंत्रणा वापरात आणावी. जनरल प्रॅक्‍टिशनर्स, प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्‍टर यांनाही ऍक्‍शन मोडमध्ये आणावे लागेल. ग्रामीण असो वा शहरी रुग्णांवर तेथेच उपचार सुरु झाले पाहिजेत. जो कुणी गंभीर आहे, त्रास होतोय, वयस्कर आहे, व्याधीग्रस्त आहे त्यालाच बेड, ऑक्‍सिजन, व्हेटिंलेटर मिळायला हवा. त्यात हयगय होता कामा नये. त्या पातळीवर वरिष्ठ अधिकारी, सिव्हिलचे अधिष्ठाता, कोरोना नोडल ऑफिसर यांनी नियंत्रण करावे.'' 

ते म्हणाले, ""जिल्ह्याचा संपूर्ण ताण सांगली, मिरजेवर आहे. इथली व्यवस्था कोलमडून गेली आहे. ज्यांची आर्थिक स्थिती उत्तम आहे, त्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घ्यावेत, मात्र सामान्य लोकांचीही फरफट होता कामा नये. कुणी अत्यवस्थ असेल तर त्यालाही चांगल्या दवाखान्यात महात्मा फुले योजनेतून उपचार मिळायला हवेत. ही राजकारण करण्याची, श्रेयवाद घेण्याची वेळ नाही. या घडीला माणसांच्या मदतीला उभे राहिले पाहिजे. त्यासाठी आम्ही चारशे लोक स्वयंसेवक म्हणून देण्याची तयारी आहे. गरज लागली तर पुणे, मुंबईतून डॉक्‍टर, परिचारिका बोलवा. त्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ, मात्र आता हातावर हात धरून बसण्याची वेळ नाही. हे घडले नाही तर मात्र जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करावे लागेल.'' 
 

फडणवीस दौऱ्यावर 

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पश्‍चिम महाराष्ट्रातील आणि सांगली जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीची पाहणी करण्यासाठी दौरा करावा, अशी विनंती खासदार पाटील यांनी केली होती. ती मान्य करत श्री. फडणवीस दोन दिवसांत जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stop caring for corona patients; Two day ultimatum - MP Sanjay Patil