प्रशासनाच्या निषेधार्थ कडकडीत बंद पाळा; निपाणीत उद्या बंदचं आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रशासनाच्या निषेधार्थ कडकडीत बंद पाळा; निपाणीत उद्या बंदचं आवाहन

काळा दिनी सीमाभागात १ नोव्हेंबरला लोकशाही मार्गाने बंद पाळण्याची परंपरा आहे. मात्र पोलिस प्रशासन दडपशाही करीत मराठी भाषिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणत आहे.

प्रशासनाच्या निषेधार्थ कडकडीत बंद पाळा; निपाणीत उद्या बंदचं आवाहन

निपाणी - काळा दिनी सीमाभागात १ नोव्हेंबरला लोकशाही मार्गाने बंद पाळण्याची परंपरा आहे. मात्र पोलिस प्रशासन दडपशाही करीत मराठी भाषिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणत आहे. बंदचे आवाहन केल्यावर निपाणी पोलिस आणि पालिका प्रशासन बंद न पाळण्याचे आवाहन करीत असल्याने प्रशासन लोकशाहीविरोधी असल्याचे सिध्द झाले आहे. प्रशासनाच्या दडपशाहीचा निषेध म्हणून अधिक उत्साहाने उद्या मंगळवारी (ता. १) शहर परिसरात कडकडीत बंद पाळण्याचे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समिती, शिवसेना व मराठी भाषिक कार्यकर्त्यांनी केले आहे.

बंदच्या पार्श्वभूमीवर आज (ता. ३१) सायंकाळी महाराष्ट्र एकीकरण समिती, शिवसेना व मराठी भाषिक कार्यकर्त्यांची बैठक झाली. बैठकीत डाॅ. अच्युत माने म्हणाले, आमदार, खासदारांसह सर्वच लोकप्रतिनिधींना निवडणुकीवेळी येथील मराठी भाषिकांची मते पाहिजेत, मात्र मराठी कार्यक्रम का नको? असा प्रश्न आहे. आजच्या प्रशासनाच्या दडपशाहीत राजकीय नेते, लोकप्रतिनिधींचा यांचाही समावेश असल्याने तेही लोकशाही विरोधी असल्याचे स्पष्ट झाले आहे. अधिकारी आणि नेत्यांचा निषेध म्हणून बंदच्या माध्यमातून अधिक एकजूट दाखवावी.

महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष जयराम मिरजकर म्हणाले, दोन वर्षे कोरोना संसर्गामुळे काळा दिन कार्यक्रमात अडथळे आले. पण अनेक वर्षापासून लोकशाही मार्गाने काळा दिनी बंदची परंपरा असताना यंदा प्रशासनाने दबावतंत्राच्या आधारे कोणताही कार्यक्रम घेण्यास मनाई केली आहे. पोलिस कोणतेही अर्ज घेत नसल्याने निर्बंध लादत आहेत. बंद न पाळण्याचे आवाहन करीत प्रशासन संभ्रम निर्माण करीत आहे. कितीही अडचणी आल्या तरी मराठी भाषिकांनी लढ्याची तीव्रता कायम ठेवली आहे. मंगळवारी (ता. १) कडकडीत बंद पाळून सर्वांनी महाराष्ट्रात जाण्याची इच्छा व्यक्त करावी.

उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख बाबासाहेब खांबे म्हणाले, सीमाप्रश्नी शिवसेना सदैव महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीशी खंबीर राहिली आहे. शिवसेनेने लढ्यासाठी ६९ हुतात्मे दिले आहेत. लोकशाही मार्गाने बंदची परंपरा असताना प्रशासन जबरदस्तीने बंद न पाळण्याचे आवाहन करीत आहे. प्रत्येक राजकीय नेत्यांनी आजवर सीमाप्रश्नाच्या आधारे स्वतःची पोळी भाजून घेतली आहे. मात्र आता या नेत्यांना मराठी लोकांचा विसर पडला आहे. प्रशासनाच्या दडपशाहीला बळी न जाता मराठी भाषिकांनी कडकडीत बंद पाळून बंदमध्ये सहभागी व्हावे.

यावेळी शरदचंद्र मळगे, माजी नगरसेवक नंदकुमार कांबळे, रमेश निकम, धोंडीराम पवार, उमेश भोपे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

...तर मानवी साखळी

पोलिस प्रशासनाकडे काळा दिनी धर्मवीर संभाजीराजे चौकात मानवी साखळीसाठी परवाना मागितला आहे. सकाळी १० वाजता होणारया मानवी साखळीसाठी प्रशासनाने परवान्यासाठी चालढकल चालवली आहे. प्रशासनाने परवाना दिल्यास मानवी साखळी आयोजित केली असल्याचे जयराम मिरजकर यांनी सांगितले.