सांगली जिल्ह्यात कडकडीत बंद ...मोर्चा

sangli morcha.jpg
sangli morcha.jpg

सांगली- सीएए, एनआरसी आणि एनपीआर कायद्याविरोधात बहुजन क्रांती मोर्चाने पुकारलेल्या भारत बंदला सांगलीत प्रतिसाद मिळाला. सांगली-मिरजेसह जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. मिरजेत बंद दरम्यान एका रिक्षावर दगडफेक करण्यात आली. एसटी, बसेससह रिक्षा सेवा बंद करण्यात आली होती. अपवाद वगळता अनुचित प्रकार घडला नाही. सांगलीत कडकडीत बंद पाळून हजारोंच्या उपस्थितीत मोर्चा काढण्यात आला. "एकच पर्व-बहुजन सर्व' या घोषणांनी सांगली दणाणून गेली. 


बहुजन क्रांती मोर्चाने भारत बंदची हाक दिल्यानंतर आज सांगली शहरातील प्रमुख पेठांमध्ये बंदचे वातावरण होते. काहीजणांनी दुकाने उघडी ठेवली होती. परंतू कार्यकर्त्यांनी दुचाकीवरून फेरी काढून बंदचे आवाहन केल्यानंतर पटापट उघडी असलेली दुकाने बंद झाली. अवघ्या काही वेळेत संपूर्ण सांगली बंद झाल्याचे चित्र दिसले. सांगलीसह उपनगरातही बंदचे आवाहन करण्यात आल्यामुळे तिथेही प्रतिसाद मिळाला. 


सांगलीत बसस्थानकासमोर हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते गोळा होत होते. बंदची स्थिती पाहून बसस्थानकावरून एसटी बसेसची सेवा देखील बंद करण्यात आली. काही रिक्षा संघटनाही बंदमध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे पेठांमध्ये शुकशुकाट जाणवत होता. मोर्चासाठी बसस्थानकासमोरील डॉ. आंबेडकर पुतळ्यासमोर हजारो कार्यकर्ते आणि महिला भर उन्हात जमल्या होत्या. सीएए, एनआरसी आणि एनपीआर कायद्याच्याविरोधात फलक झळकत होते. तिरंगा झेंड्यासह भगवे, निळे, पिवळे, हिरवे झेंडे फडकत होते. 


सांगली परिसरातून हजारो कार्यकर्ते डॉ. आंबेडकर पुतळ्यासमोर एकवटल्यानंतर जोरदार घोषणाबाजी करत मोर्चास सुरवात झाली. मारूती चौकातून मोर्चा मेन रोडवरून राजवाडा चौकमार्गे स्टेशन चौकात आल्यानंतर सभेत रूपांतर झाले. हजारोंच्या संख्येने स्टेशन चौक परिसर गजबजून गेला. "एकच पर्व..बहुजन सर्व' अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. 


मोर्चासमोर बोलताना डॉ. राजेंद्र कवठेकर म्हणाले, ""आजच्या भारत बंदची दखल जगभरातील मिडियाने घेतली आहे. युनोमध्ये देखील याची चर्चा सुरू झाली आहे. देशातील मूलनिवासींनाच खऱ्या अर्थाने सत्तेवर राहण्याचा अधिकार आहे. त्यामुळे ज्यांचा डीएनए परदेशी आहे अशा युरेशियन लोकांना आता त्यांच्या देशात पाठवले जाईल. देशात यादवी माजावी म्हणून संविधान मोडीत काढणारे कायदे आणले जात आहेत. त्यामुळे केवळ मुस्लिमच नव्हेतर इथल्या बहुजनांचे नागरिकत्व धोक्‍यात आले आहे. इथल्या मूलनिवासींना विदेशी ठरवण्याचे षडयंत्र रचले आहे. ईव्हीएम सारखी यंत्रणा सरकारच्या ताब्यात असल्यामुळे आज ते देशावर राज्य करत आहेत. भयानक कायदे करत आहे. आमची लढाई आता यापुढे पक्षाशी नव्हे तर युरेशियन ब्राह्मणांशी असेल.'' 


प्रदेशाध्यक्ष संगीता शिंदे म्हणाल्या, ""सीएए, एनआरसी विरोधात रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. हा कायदा रद्द केल्याशिवाय गप्प बसणार नाही. डीएनए च्या आधारावर कायदा करा अशी आमची मागणी राहील. कायदा रद्द केला नाहीतर संपूर्ण भारतात जेलभरो आंदोलन केला जाईल.'' 


विक्रम कांबळे, मुफ्ती मुज्जमील, उत्तम कांबळे, शकुंतला कांबळे, उमर गवंडी, हाफीज महंमद अली, सतीश मोहिते, जयश्री पाटील, डॉ. महेश कांबळे, प्रल्हाद मलमे, प्रा. सुकुमार कांबळे यांनी भाषणातून भाजप सरकारवर जोरदार टीका केली. मोर्चासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात होता. 

असाही निषेध- 
मोर्चात सहभागी झालेल्या अनेकांनी निषेधार्थ काळ्या रंगाचे टी-शर्ट घातले होते. त्यावर सीएए, एनआरसी, एनपीआर लिहून त्यावर फुली मारली होती. काही कार्यकर्त्यांनी चहाची किटली मोठ्या काठीवर टांगून कायद्याला विरोध दर्शवणारे स्टीकर लावले होते. पांढऱ्या रंगाचे टी-शर्ट घातलेल्या कार्यकर्त्यांनी त्यावर "इन्कलाब-जिंदाबाद' असे छापले होते. 

दगडफेक..वादावादीचे प्रसंग- 
सांगलीसह मिरज आणि जिल्ह्यात कडकडीत बंद पाळला. मिरजेत एका रिक्षावर दगडफेक करण्यात आली. सांगलीत बसस्थानकावर दुकाने बंद करण्यावरून वादाचा प्रसंग घडला. पोलिसांनी तत्काळ धाव घेऊन वादावर पडदा टाकला. काही व्यापाऱ्यांनी दुकाने उघडी ठेवली होती. परंतू कार्यकर्त्यांनी आवाहन केल्यानंतर दुकाने बंद केली. 
.................. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com