कोरोनामुळे तंतुवाद्यांचा सूर अद्याप बेसूर... कारागिरांची उपासमार; मागणी घटली, निर्यातही थांबली

प्रमोद जेरे
Friday, 2 October 2020

कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे बंद झालेल्या संगीताच्या मैफली, यात्रा, जत्रा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे तंतू वाद्यांच्या माहेरघरातील सूरही अद्यापही बेसूरच आहे. बारा महिने गजबजलेल्या मिरजमधील सतारमेकर गल्लीत गेल्या सात महिन्यांपासूनचा शुकशुकाट अजूनही कायम आहे.

मिरज (जि. सांगली ) : कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे बंद झालेल्या संगीताच्या मैफली, यात्रा, जत्रा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे तंतू वाद्यांच्या माहेरघरातील सूरही अद्यापही बेसूरच आहे. बारा महिने गजबजलेल्या मिरजमधील सतारमेकर गल्लीत गेल्या सात महिन्यांपासूनचा शुकशुकाट अजूनही कायम आहे. साहजिकच या व्यवसायावर अवलंबून असलेल्या शेकडो कारागिरांची उपासमार समाजाकडूनही दुर्लक्षित होते आहे. "शास्त्रीय संगीताची पंढरी' आणि "तंतुवाद्याचे माहेरघर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिरजेतील तंतुवाद्य व्यवसाय गेल्या सात महिन्यांपासुन ठप्प आहे. 

देशांतर्गत तंतूवाद्यांची वाहतूक ही अधिकाधिक प्रमाणात रेल्वेने होत असते. परंतु सध्या रेल्वेची वाहतूक काही तुरळक सुरू असल्याने तंतुवाद्यांच्या देशांतर्गत वाहतुकीवरही मर्यादा आल्या आहेत; तर यापूर्वी परदेशात निर्यात झालेली तंतुवाद्येही विविध देशांच्या विमानतळावर अद्याप अडकून पडली आहेत. याशिवाय अनेक तंतुवाद्ये पोस्टाच्या गोदामात पडून आहेत. संसर्गाच्या भितीने अनेक जाचक तपासण्याचे नवे अडथळे हे याच व्यवसायासमोरचे मोठे आव्हान आहे. परदेशातील कलाकारांकडून होणारी मागणीही गेल्या सात महिन्यापासून थांबली आहे. याचा मोठा परिणाम वाद्यांच्या निर्यातीवर झाला आहे. त्यामुळे तंतुवाद्य व्यावसायिकांना याचा लाखो रूपयांना फटका बसला. 

मिरज शहराचा भारताशिवाय जगभरात दर्जेदार तंतुवाद्य निर्मितीसाठी विशेष लौकिक आहे. मागील दीडशे वर्षांहून अधिक काळ सुरू असलेल्या या व्यवसायात शेकडोंच्या संख्येने व्यावसायिक आणि हजारो कारागीर कार्यरत आहेत. गेली अनेक वर्षे येथील तंतुवाद्ये जगभरातील विविध देशात निर्यात होतात. या वाद्यांच्या दुरस्तीसाठीही येथील अनेक कारागिरांना परदेशात निमंत्रण देऊन बोलावले जाते. अनेक वाद्ये पोस्टाच्या रजिस्टर सेवेद्वारे परदेशात निर्यात केली जातात. सात महिन्यांपूर्वी वर्षाला हजारोंच्या पटीत निर्यात होणाऱ्या या वाद्यांची संख्या आता अवघी शेकड्यांच्या पटीत आली आहे. ही वाद्ये युरोपसहीत जपान, चीनमध्ये पाठवण्यात आली आहेत. परंतु या देशांत कोरोनाच्या भीतीमुळे बाहेरून आलेल्या वस्तूंवर अधिक लक्ष ठेवण्यात येत आहे. त्यामुळे संसर्गाची शक्‍यता लक्षात घेऊन मिरजेची तंतुवाद्ये तपासणी करण्यासाठी विमानतळावरच अडवण्यात आली आहेत. विमानतळाच्या गोदामातच ती पडून असल्याने अनेक कलाकारांपर्यंत पोहचलेली नाहीत. 

परदेशातील कलाकार कोरोनाशी अद्यापही झुंज देत असल्याने गेल्या सात महिन्यात त्यांच्याकडूनही तंतुवाद्यांना मागणी नाही. काही कलाकारांनी केलेल्या तंतुवाद्यांच्या मागणीबाबतीतही संबंधित कलाकारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने वाद्ये परदेशी निर्यात करणाऱ्या तंतुवाद्य व्यावसायिकांना लाखो रूपयांचा फटका बसला आहे. या सगळ्या संकटाचा मोठा परिणाम मिरज शहरातील हजारो तंतुवाद्य कारागिरांच्या रोजीरोटीवर झाला आहे. तंतू वाद्यांची निर्मिती ठप्प झाल्याने हे कारागीर आता अन्य छोट्या-मोठ्या व्यवसायाकडे वळले आहेत 

साधी विचारपूस देखील नाही

तंतुवाद्य व्यवसायिक आणि कारागीर हे दोघेही सहनशील आहेत. गेल्या सात महिन्यांपासून तंतुवाद्य निर्मिती उद्योग मोठ्या संक्रमणातून चालला असूनही, त्यांची कोणीही साधी विचारपूस देखील केली नाही. सहाजिकच या कलेपासून आता दुरावलेला आणि पोटापाण्यासाठी अन्य व्यवसायाकडे वळलेला कलाकार पुन्हा या कारागिरीकडे येणे कठीण आहे. त्यामुळे तंतुवाद्य व्यवसायाचे भविष्य अवघड वाटते आहे. 
- अल्ताफ सतारमेकर, संचालक सरस्वती तंतुवाद्य केंद्र 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The strings are still out of tune because of the corona ...no Demandl, exports stopped