esakal | एसटीचा दिवाळी हंगाम कडूच; केवळ 84 लाख उत्पन्न
sakal

बोलून बातमी शोधा

 ST's Diwali season is bitter; Only 84 lakh income

कोरोना आपत्तीचा यंदा एसटी च्या दिवाळी काळातील उत्पन्नात फार मोठी घट झाली. जादा उत्पन्न मिळणाऱ्या दिवाळी सुटीच्या काळात यंदा 11 दिवसात केवळ 84 लाख 70 हजार 249 रूपये इतके उत्पन्न मिळाले.

एसटीचा दिवाळी हंगाम कडूच; केवळ 84 लाख उत्पन्न

sakal_logo
By
घनशाम नवाथे

सांगली : कोरोना आपत्तीचा यंदा एसटी च्या दिवाळी काळातील उत्पन्नात फार मोठी घट झाली. जादा उत्पन्न मिळणाऱ्या दिवाळी सुटीच्या काळात यंदा 11 दिवसात केवळ 84 लाख 70 हजार 249 रूपये इतके उत्पन्न मिळाले. भारमान देखील 40.33 इतके कमी राहिले. गतवर्षी 12 कोटी 19 लाख रूपये उत्पन्न मिळाले होते. यंदा केवळ 84 लाख 70 हजार रूपये उत्पन्नावर समाधान मानावे लागले. 

"प्रवाशांच्या सेवेसाठी' हे ब्रीदवाक्‍य घेऊन धावणाऱ्या एस.टी.ला यंदाच्या वर्षात सर्वाधिक फटका बसला. भारमान वाढवा अभियान मार्च महिन्यात सुरू केले. त्याचवेळी कोरोनाचे संकट निर्माण झाले. एस.टी.चे चाक जागेवर थांबले. त्यानंतर राज्यात अडकलेल्या मजूर, विद्यार्थी, नोकरदारांना एस.टी.ने परराज्यात सुखरूप सोडले. कोरोनाच्या अनलॉक प्रक्रियेत एस.टी.चा प्रवास पुन्हा सुरू झाला. निम्म्या क्षमतेने, सध्या पूर्ण प्रवासी क्षमतेने एस.टी. प्रवासास मान्यता दिली आहे. परंतू अद्यापही सर्व मार्गावर एस. टी. धावत नाही. ठराविक मार्गावरच एस. टी. धावते. 

कोरोना संकटात एस.टी.चे मोठे नुकसान झाले. थकीत पगाराचा प्रश्‍नही निर्माण झाला होता. आंदोलन करावे लागले. उत्पन्न वाढीसाठी काही महिन्यांपासून एस.टी. मालवाहतूक देखील करत आहे. दिवाळीच्या सुटीत जादा फेऱ्यांचे नियोजन केले. त्यासाठी 11 दिवसांचा कालावधी निश्‍चित केला. ज्या मार्गावर प्रवासी संख्या जास्त तेथे जादा फेऱ्या निश्‍चित केल्या. परंतू यंदाची दिवाळी एसटीच्या सांगली विभागासाठी म्हणावी तशी चांगली गेली नसल्याचे चित्र दिसले. कोरोनाच्या प्रभावामुळे अनेक प्रवाशांनी दिवाळीत प्रवास टाळल्याचे चित्र दिसले. 

गतवर्षी दिवाळीत 11 दिवसांत एस.टी.ने तब्बल 32 लाख 52 हजार किलोमीटरचा टप्पा पार केला. प्रतिकिलोमीटर 37.51 रूपये प्रमाणे 12 कोटी 19 लाख 61 हजार रूपये उत्पन्न मिळवले होते. तर त्यावेळी सरासरी भारमान 60.41 इतके राहिले. गतवर्षीच्या दिवाळी हंगामाची तुलना केली तर यंदा एक कोटीचा टप्पा देखील एसटीला पार करता आला नाही. 11 दिवसांत केवळ 4 लाख 5 हजार 865 किलोमीटर अंतर कापले गेले. तर उत्पन्न 84 लाख 70 हजार 249 इतके मिळाले. भारमान देखील 40.33 इतकेच राहिले. 

उत्पन्नात मिरज, भारमानात पलूस पुढे 

दिवाळी काळात सांगली विभागात मिरज आगाराने उत्पन्न मिळवण्यात बाजी मारली. सर्वाधिक 18 लाख 14 हजार रूपये इतके उत्पन्न मिळवले. त्याखालोखाल तासगाव आगाराने 14 लाख 41 हजार रूपये उत्पन्न मिळवले. आटपाडी आगाराचे उत्पन्न सर्वात कमी 1 लाख 81 हजार रूपये राहिले. भारमानामध्ये पलूस आगार आघाडीवर राहिले. 11 दिवसातील भारमान 52.75 इतके सर्वाधिक होते. 

संपादन : युवराज यादव