esakal | Womens Day "एसटी'चे स्टेअरिंग आलं महिलांच्या हाती..!
sakal

बोलून बातमी शोधा

STs steering is in the hands of women

एसटी चालक म्हणून रुजू होण्यासाठी वर्षभराचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अवजड वाहन चालविण्याचा अनुभव नसल्याने त्यांना नियमानुसार प्रशिक्षण दिल्यानंतर या सर्व महिलांना सेवेत दाखल करून घेतले जाणार आहे. 

Womens Day "एसटी'चे स्टेअरिंग आलं महिलांच्या हाती..!

sakal_logo
By
दौलत झावरे

नगर ः महिलांनी आता सर्वच क्षेत्रात यशस्वीपणे जबाबदारी सांभाळलेली आहे. राज्य परिवहन महामंडळामध्ये कारकुनानंतर वाहक व आता थेट चालकपदावर महिला विराजमान झाल्या आहेत. अहमदनगर विभागामध्ये आता तीन महिलांची निवड झाली आहे. त्यांचे औरंगाबाद येथे वाहन चालविण्याचे प्रशिक्षण सुरू आहे. 

सर्वच क्षेत्रात महिलांनी आपले वर्चस्व सिध्द केलेले असून आता एसटीतही त्या आपले वर्चस्व प्रस्तावित करीत आहेत. चालकपदापासून एसटीमध्ये दाखल झालेल्या महिलांनी टप्प्याटप्प्याने सर्वच पदांचा पदभार स्वीकारलेला आहे. 2003 नंतर वाहकपदावर महिलांना संधी मिळाली होती. चालकपदावरही महिलांना संधी मिळावी, अशी अनेक महिलांनी व्यक्त केली होती. महिलांच्या मागणीचा विचार करून त्यांनाही संधी देण्यात आली आहे.

हेही वाचा - बहिणीसाठी आलेला काळ पाहून ती पुढे सरसावली

राज्यात 163 महिलांची चालक पदासाठी निवड झाली. त्यांचे आता प्रशिक्षण सुरू आहे. औरंगाबाद येथे नाशिक, औरंगाबाद, नगर, धुळे, जळगाव, जालना, परभणी येथील एकूण 32 महिलांना वाहनचालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. या सर्वांना एसटी चालक म्हणून रुजू होण्यासाठी वर्षभराचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अवजड वाहन चालविण्याचा अनुभव नसल्याने त्यांना नियमानुसार प्रशिक्षण दिल्यानंतर या सर्व महिलांना सेवेत दाखल करून घेतले जाणार आहे. 

सुनंदा सोनवणे (रा. कपिलनगर, औरंगाबाद) ः खाकी वर्दीविषयी आकर्षण होतं. मोठे झाल्यानंतर पोलिस किंवा एसटीत खात्यातच नोकरी करण्याचे ध्येय होतं. एम.ए.बी.एड. शिक्षण घेऊनही शिक्षक होण्यापेक्षा खाकीच्या आकर्षणामुळे पोलिस भरतीत प्रयत्न केले. परंतु यश आले नाही. त्यातच एसटीची चालकपदाची जाहिरात आल्यानंतर अर्ज केला. त्यात निवड झाली. यामुळे खाकीवर्दी व वाहनचालविण्याची आवड हे दोन्ही स्वप्न माझे पूर्ण झाले. या नोकरीस घरातून विरोध होता. परंतु तो मावळत चालला आहे. आता मला सर्वांचा पाठिंबा मिळत आहे. 

सोनाली भागडे (रा. वारंघुशी, ता. अकोले) ः पोलिस खात्यात नोकरी करण्याचं स्वप्न होते. पण ते पूर्ण होऊ शकले नाही. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर नोकरीचे स्वप्न अधुरे राहिले. त्यातच लग्न झाल्यानंतर पतीनेही स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला साथ दिली. ते एसटीत नोकरीस असल्यामुळे त्यांनी मला चालकपदावर कामासाठी प्रोत्साहन दिलं. माहेरबरोबरच सासरच्या सर्वांनीच मला साथ मिळत आहे. संसाराचा गाडा सांभाळून आपण एसटीचे स्टेअरिंगचा तोल यशस्वी संभाळणार आहोत. 

आशा खंडीझोड (रा. शहरापूर, ता. कोपरगाव) ः मी ग्रामीण भागातील आहे. आमच्या गावात एसटी बस थांबत नव्हती. लहानपणापासून एसटीविषयी आवड होती. एसटीमध्ये नोकरी करावी, असे आपलं स्वप्न होते. त्या दृष्टीने आपण प्रयत्न केले. आई-वडिल अपंग असले तरी त्यांनी मी व माझ्या भावांचे शिक्षण केले. त्यानंतर माझे लग्न झाले. लग्नानंतरही स्वप्नांचा पाठलाग केला. यासाठी माझ्या पती व आई-वडिलांनी मला नेहमीच साथ दिली. 

नगर विभागातील कर्मचाऱ्यांची आकडेवारी 
चालक (पुरुष) ः 1364 
चालक (महिला) ः तीन 
वाहक (पुरुष) ः 1196 
वाहक (महिला) ः (187) 
इतर विभागात (महिला) ः 139 
एकूण कर्मचारी ः 4235 

औरंगाबादमधील प्रशिक्षणार्थी महिलांची संख्या 
नाशिक ः दहा 
औरंगाबाद ः सहा 
अहमदनगर ः तीन 
धुळे ः एक 
जळगाव ः आठ 
जालना ः एक 
परभणी ः तीन 

loading image