video बघा गुरूजींसाठी काय केलं विद्यार्थ्यांनी

डॉ. अरुण गव्हाणे
गुरुवार, 16 जानेवारी 2020

निरोप देताना विद्यार्थी आणि शिक्षक तर हमसून हमसून रडत होतेच; शिवाय विद्यार्थ्यांच्या पालकांनाही अश्रू आवरता आले नाहीत! अनेकांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. 

पोहेगाव : विद्यार्थिप्रिय शिक्षक अशी बिरुदावली शिक्षकांच्या बाबतीत अधूनमधून वाचायला, ऐकायला मिळते. परंतु पालकप्रिय शिक्षक असा उल्लेख क्वचितच केला जातो.

पोहेगाव (ता. कोपरगाव) येथील खालकर मळ्यातील शाळेत तब्बल दहा वर्षे ज्ञानदानाचे काम करणारे दिनकर घोडके यांच्या बाबतीत ही "पालकप्रिय शिक्षक' ही बिरुदावली सार्थ ठरणारी आहे. घोडके यांची या शाळेतून बदली झाल्यानंतर त्याची प्रचिती आली...

जाणून घ्या- नगरमध्ये काय घडलं छत्रपती-रामदासांबद्दल 

रांजणगाव देशमुख येथील खालकर मळ्यात असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतून घोडके यांची श्रीगोंदे तालुक्‍यात बदली करण्यात आली आहे. त्यांना निरोप देण्याचा अनोखा कार्यक्रम विद्यार्थी व पालकांनी आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे, निरोप देताना विद्यार्थी आणि शिक्षक तर हमसून हमसून रडत होतेच; शिवाय विद्यार्थ्यांच्या पालकांनाही अश्रू आवरता आले नाहीत! अनेकांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. 

पटसंख्या फक्त 11 वर आल्याने खालकर मळा शाळेचे नाव बंद पडणाऱ्या शाळांच्या यादीत होते. पण घोडके यांनी त्याची भीती न बाळगता शाळेचे संपूर्ण रूप पालटले. वरिष्ठ शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीच्या मदतीने भौतिक सुविधा वाढविल्या. त्यामुळे परिसरातील पालकांनी खालकर मळा शाळेला पसंती देत या शाळेत आपल्या पाल्यांना पाठवायला सुरवात केली. शाळेचा पट 35 वर गेला. कल्पकतेचा वापर करत घोडके यांनी विद्यार्थ्यांनाच नाही, तर त्यांच्या पालकांमध्येही शाळेविषयी, शिक्षकांविषयी आपुलकी निर्माण केली. त्यातूनच घोडके विद्यार्थिप्रिय शिक्षक झाले आणि पालकप्रियही! 

क्‍लिक करा -  तीच्या मुलावर आली संक्रांत 

त्यामुळेच घोडके यांची बदली झाल्याचे विद्यार्थ्यांकडून समजल्यानंतर त्यांच्या पालकांनीच घोडके यांचा निरोप समारंभ आयोजित केला होता. या वेळी विद्यार्थी आणि घोडके यांचे सहकारी शिक्षक तर रडत होतेच; शिवाय पालकांनीही आपल्या आसवांच्या अभिषेकात घोडके यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. त्यांना नवे कपडे देण्यात आले. समारंभानंतर सर्वांना स्नेहभोजनही दिले. 

निरोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी ऍड. राहुल रोहमारे होते. कर्मवीर शंकरराव काळे साखर कारखान्याचे संचालक सुनील शिंदे, गोदावरी दूध संघाचे संचालक सुनील खालकर, के. डी. खालकर, अनिल खालकर, रांजणगावचे सरपंच संदीप रणधीर, उपसरपंच बाबासाहेब गोर्डे, जवळकेचे सरपंच बाबूराव थोरात यांच्यासह यापूर्वी खालकर मळा शाळेत नोकरी केलेले सर्व शिक्षक उपस्थित होते.

ऍड. राहुल रोहमारे या वेळी म्हणाले, की चांगल्या कामाचा नेहमी सन्मान होतो. पालकांनी चांगल्या कामाची दखल घेत आयोजित केलेला एका शिक्षकाच्या सत्काराचा कार्यक्रम नक्कीच वाखाणण्याजोगा आहे. मुख्याध्यापिका मनीषा कदम व रोहिदास बागडे यांनी सूत्रसंचालन केले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Students cried as teacherst them