विद्यार्थ्यांनी अनुभवला दिवस रात्रीचा खेळ; अमेरीकेतील डॉक्‍टरशी संवाद

गोरख चव्हाण
Friday, 2 October 2020

खरशिंग जिल्हा परिषद शाळेने मुलांसाठी एक वेगळाच सुखद धक्का दिला निमित्त होते..अमेरिकेतून डॉ. मीनल पाटील यांचा ऑनलाइन संवाद.

कवठेमहांकाळ (जि. सांगली ) : जगातील महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेची ओळख खरशिंग येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी अनुभवली. ऑनलाईन शिक्षण पद्धतीत नेहमीच अग्रेसर राहिलेल्या जिल्हा परिषद शाळेने मुलांसाठी एक वेगळाच सुखद धक्का दिला निमित्त होते..अमेरिकेतून डॉ. मीनल पाटील यांचा ऑनलाइन संवाद. एकाच वेळी दिवस आणि रात्र याचा अनुभव विद्यार्थ्यांना यावेळी मिळाला. ऑनलाइन कट्टा उपक्रमांतर्गत अमेरिकेतून विद्यार्थ्यांशी डॉ. मिनल पाटील यांनी संवाद साधला. 

भारतामधील विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता ही जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. भारतीय विद्यार्थ्यांना परदेशात खूप महत्व असते तसेच भारतातील सणसमारंभाची आठवण नेहमी येते असल्याचे सागत आई वडिलांचे महत्व कधीही विसरू नका असा सल्ला डॉ. मीनल पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिला. विद्यार्थ्यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली. मुलाखतीत अमेरिकेतील नियम, स्वच्छता याबद्दल डॉ. पाटील यांनी सांगितले.डॉ. मीनल पाटील एमडी (मेडिसिन) म्हणून ड्युक हॉस्पीटल अमेरिका येथे कार्यरत आहेत. ऑनलाइन संवादवेळी अमेरिकेमध्ये रात्रीचे अकरा तर भारतामधील सकाळचे आठ वाजताची वेळ होती. 

ऑनलाइन कट्टा या उपक्रमात कराड येथील प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ. विजयसिंह पाटील व डॉ. अबिद मणेर, गटशिक्षणाधिकारी आर. जी. पाटील, सरपंच सुहास पाटील उपस्थित होते. ऑनलाइन कट्ट्याची संकल्पना तारीश अत्तार यांनी राबवली. महिन्यातून दोन वेळा विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी हेतूने वेगवेगळ्या पाहुण्यांना ऑनलाईन कट्ट्यावर आमंत्रित केले जाते.

प्रास्ताविक अंजुम अत्तार व आभार विद्यार्थी तन्मय माने यांनी मानले. उपक्रमास मुख्याध्यापिका सुप्रिया शिंदे, साहेबलाल तांबोळी, अण्णाप्पा शिंदे, संगीता कोरे, वंदना माळी, शुभांगी घाटे, अर्चना वाघमारे, स्वाती यादव, अंजुम अत्तार व पूनम माने यांचे सहकार्य मिळाले. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Students experienced day and night games; Conversation with a doctor in the United States