
पोलीस उपनिरीक्षक भरती गैरव्यवहार प्रकरण सीबीआय कडे सुपूर्द केले जावे : सतीश जारकीहोळी
बेळगाव : पोलीस उपनिरीक्षक भरती गैरव्यवहार प्रकरणात राजकारणी, वरिष्ठ पोलीस अधिकारी सहभागी असल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हे प्रकरण केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सुपूर्द केले जावे, अशी मागणी कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी केली.
गोकाक येथील हिल गार्डन कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या घोटाळ्यात पोलीस अधिकारी देखील सहभागी झाली आहेत. त्यामुळे सरकारने पोलिसांकडूनच हा तपास करणे कितपत योग्य आहे?, असा सवाल श्री. जारकीहोळी यांनी यावेळी उपस्थित केला. एकच परीक्षा केंद्रावर परीक्षा लिहिलेले अनेक उमेदवार यात पास झाले आहेत. त्यासाठी ब्लूटूथचा वापर देखील करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाची प्रामाणिक चौकशी करून यात सहभागी असलेल्यांवर योग्य कारवाई होणे आवश्यक आहे.
पोलीस उपनिरीक्षक भरती प्रक्रियेत झालेल्या गैरव्यवहारात वरिष्ठ पोलीस अधिकारी, मंत्री आणि आमदारांची नावे पुढे येत आहेत. माजी मुख्यमंत्र्याच्या मुलाचे नाव देखील यात आता ऐकू येत आहे. त्यामुळे या प्रकरणाची कसून चौकशी झाली पाहिजे. दिव्या हागरगी यांना काँग्रेसने लपवून ठेवण्यासाठी ते लहान मुलं नव्हेत. भाजपच्या वरिष्ठ पदावर त्या ओळखल्या जातात, असे भाजपला प्रत्युत्तर दिले.
विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या हे ७ व ८ मे रोजी बेळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यातील विविध मतदारसंघात खासगी कार्यक्रमात भाग घेणार असून त्यांच्या सोबत आपणही असणार आहे. तर केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार हे ७ मे रोजी बेळगाव काँग्रेस भवनमध्ये विधान परिषद नैऋत्य पदवीधर मतदारसंघ निवडणुकीबाबत बेळगाव शहर, ग्रामीण, चिकोडी, विजापूर, बागलकोट जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची सभा घेणार असल्याची माहिती यावेळी श्री. जारकीहोळी यांनी पत्रकारांना दिली.
-विनायक जाधव
Web Title: Sub Inspector Police Recruitment Fraud Case Handed Over Cbi Satish Jarkiholi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..