बाजार समितीच्या परीक्षेत सहकारमंत्री देशमुख नापास 

प्रमोद बोडके
मंगळवार, 3 जुलै 2018

सोलापूरचे पालकमंत्री तथा आरोग्य राज्यमंत्री विजयकुमार देशमुख यांनी विरोधी पॅनेमध्ये जाऊन बाजार समितीत सर्वाधिक मतांनी विजयी होण्याचा मान मिळविला आहे.

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या सिद्धरामेश्‍वर बाजार समिती परिवर्तन पॅनेलला शेतकरी मतदार संघातील 15 पैकी फक्त दोन जागा मिळाल्या आहेत. शेतकऱ्यांना मतदानाचा हक्क दिल्यानंतर पहिल्यांदाच या समितीची निवडणूक झाली.

सोलापूरचे पालकमंत्री तथा आरोग्य राज्यमंत्री विजयकुमार देशमुख यांनी विरोधी पॅनेमध्ये जाऊन बाजार समितीत सर्वाधिक मतांनी विजयी होण्याचा मान मिळविला आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी या निवडणुकीसाठी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार दिलीप माने यांच्या नेतृत्वाखाली सिद्धेश्‍वर शेतकरी विकास आघाडीच्यावतीने ही निवडणूक लढविली. 15 पैकी 13 जागा जिंकून या पॅनेलने दमदार एन्ट्री केली आहे. व्यापारी, अडते व हमाल व तोलार या मतदार संघातील तिन्ही जागा पालकमंत्री देशमुख, आमदार म्हेत्रे, माजी आमदार माने यांच्या समर्थकांच्या आहेत. शेतकऱ्यांना मतदानाचा मिळवून दिलेला हक्क व यापूर्वी समितीत झालेला गैरव्यवहार बाजार समितीच्या निवडणुकीत सहकारमंत्री गटाच्या प्रचाराचा प्रमुख मुद्दा ठरला. अपयशी कर्जमाफी, शेतमालाचे घसरलेले भाव आणि निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन संचालक मंडळांवर दाखल केलेले गुन्हे या मुद्यांवर ही निवडणूक गाजली. 

माजी आमदार माने ठरले विजयाचे शिल्पकार 
2014 च्या विधानसभा निवडणुकीत सहकारमंत्री देशमुख यांच्याकडून पराभूत झालेले माजी आमदार दिलीप माने यांना टार्गेट करून सहकारमंत्री देशमुख यांनी ही निवडणूक लढविली. खास कायद्यात बदल करून गेल्या दीड वर्षांपासून प्रशासकाची नियुक्ती केली आहे. पणन महासंलकांनी मान्यता दिलेल्या लेखापरीक्षण अहवालाचे पुन्हा लेखापरीक्षण करून निवडणुकीच्या तोंडावर माजी आमदार माने यांच्यासह 33 तत्कालीन संचालकांवर गुन्हे दाखल केले. राजकीय मुत्सगिरी आणि बेरेजेचे राजकारण करून माजी आमदार माने यांनी ही निवडणूक जिंकून दाखविली आहे. 

सहकारमंत्री विरुद्ध सर्वचा फॉर्म्युला यशस्वी 
बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करणे, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक मंडळ बरखास्त करणे, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना विश्‍वासात न घेणे, शिवसेनेला सोबत न घेणे या प्रमुख कारणास्तव सहकारमंत्री देशमुख यांच्या विरोधात पालकमंत्री देशमुख, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी एकत्रित होत सर्वपक्षीय आघाडी केली. या आघाडीने घवघवीत यश मिळवून दिले. 
 
दोन माजी आमदारांचा पराभव 
बाजार समितीच्या निवडणुकीत माजी आमदार शिवशरण पाटील व माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचा दारुण पराभव झाला आहे. माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी दुधनी (ता. अक्कलकोट) बाजार समितीच्या संचालकपदाचा राजीनामा देऊन ही निवडणूक लढविली होती. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Subhash Deshmukh got less votes in the market committees election