esakal | Maharashtra Budget 2021: सांगली जिल्हा रुग्णालयासाठी भरीव तरतूद; वर्षानुवर्षे रेंगाळलेला प्रकल्प मार्गी

बोलून बातमी शोधा

Substantial provision for Sangli District Hospital maharashtra budget sangli marathi news}

 सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ११३ कोटी रूपयांच्या प्रकल्पांना मान्यता

 भूमिपुत्राबद्दल जिल्हावासियातून व्यक्त होत आहे कृतज्ञता

paschim-maharashtra
Maharashtra Budget 2021: सांगली जिल्हा रुग्णालयासाठी भरीव तरतूद; वर्षानुवर्षे रेंगाळलेला प्रकल्प मार्गी
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली  : राज्याच्या अर्थसंकल्पात सांगली जिल्ह्यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ११३ कोटी रूपयांच्या प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. वर्षानुवर्षे रेंगाळलेले प्रकल्प मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी  मार्गी लावले असून भूमिपुत्राबद्दल जिल्हावासियातून कृतज्ञता व्यक्त होत आहे 
राज्याच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करणे आणि राज्यातील मोठे प्रकल्प कार्यान्वीत करणे अशा कामांना प्राधान्य देणार असल्याचे सांगून मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी आपल्या कार्याची दिशा स्पष्ट केली आहे. नुकताच मुख्य सचिव पदाचा कार्यभार हाती घेतलेले सिताराम कुंटे हे सांगली चे भूमीपुत्र आहेत. 


मुख्य सचिव पदी रूजू होताच त्यांनी सांगली जिल्ह्यातील वर्षानुवर्षे रखडलेले प्रकल्प मार्गी लावले आहेत. या अनुषंगाने गुरूवार, दि. 4 मार्च 2021 रोजी मुख्य सचिव सिताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने 113 कोटी रूपयांचे विविध प्रकल्प मार्गी लावले आहेत. मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी सांगली सोबत असणारे त्यांचे नाते जपत विशेष लक्ष घालून अधोरेखित केल्याबद्दल सर्व जिल्हावासियांमधून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त होत आहे.


 सांगली शहरातील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय परिसरामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील 29 एकर जागा उपलब्ध असून या ठिकाणी 100 खाटांचे महिला व नवजात शिशू रूग्णालय बांधण्यासाठी 2013 मध्ये मान्यता प्राप्त झालेली होती. तथापी, सदरचा प्रकल्प आत्तापर्यंत रखडलेला होता. सांगली जिल्ह्यातील सदर प्रश्नांबाबत झालेल्या पहिल्याच बैठकीत मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालयात असणाऱ्या मोकळ्या जागेत 45 कोटी 93 लाख रूपये अंदाजित खर्चाचे 100 खाटांचे (तळमजला + 2 मजले असे 7 हजार 663 चौरस मीटर क्षेत्रफळाचे) जिल्हा रूग्णालय व पोस्टमार्टम रूम बांधकाम करणे, 46 कोटी 73 लाख रूपये अंदाजित खर्चाचे 100 खाटांचे महिला नवजात शिशू रूग्णालय व धर्मशाळा बांधकाम करणे (तळमजला + 2 मजले असे 8 हजार 786 चौरस मीटर क्षेत्रफळाचे) ची कामे मंजूर केल्याने सदरची कामे होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


आटपाडी शहराचा विकास झपाट्याने होत असून लोकसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने रूग्ण संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यामुळे सद्याचे अस्तित्वात असणारे 30 खाटांचे रूग्णालय अपूरे पडत आहे. ग्रामीण रूग्णालयात परिसरातच असलेल्या रिकाम्या जागेमध्ये 50 खाटांचे रूग्णालय बांधण्यासाठी आटपाडी ग्रामीण रूग्णालयाकडून 2014 पासून पाठपुरावा करण्यात येत होता. मुख्य सचिव सिताराम कुंटे यांच्याबरोबर 4 मार्च रोजी झालेल्या बैठकीत सदरचा विषय मार्गी लावण्यात आला असून  ग्रामीण रूग्णालय आटपाडी येथील 30 खाटांवरून 50 खाटांच्या उपजिल्हा रूग्णालयात 20 कोटी 62 लाख रूपये अंदाजित खर्चाच्या श्रेणीवर्धन करण्याच्या कामासही प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. अशा एकूण 113 कोटी 28 लाख रूपये अंदाजित  खर्चाच्या प्रकल्पाला मुख्य सचिव सिताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने मंजुरी दिली असल्याने सदरचे प्रकल्प  मार्गी लागतील.

संपादन-अर्चना बनगे