आशियाई देशांसह भारतातील अनेक उद्योगांसाठी बॉयलर पुरवठ्याचे काम करणाऱ्या उद्योगाची यशोगाधा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 8 January 2021

कायझन तंत्रज्ञानाचा अंगीकार केला आहे. प्रत्येकाच्या कामाचे मूल्य समान व तितकंच महत्वाचं मानलं.

सांगली  :आशियाई देशांसह भारतातील अनेक उद्योगांसाठी बॉयलर पुरवठ्याचे काम करणारी राज बायलर्स सांगलीतील आघाडीचा उद्योग झाला आहे. दोन दशकांच्या प्रवासात आशियाई देश, आफ्रिकन देशांत कंपनीच्यावतीने सहा हजारांवर बॉयलर्स पोहचलेत. त्यांच्या उद्योगप्रवासाबद्दल सांगताहेत संचालक जफर खान 0

वडील शिक्षक होते. घरात पूर्वीपासूनच शिस्त होती. शिक्षणच तुम्हाला तारेल असं ते सांगत. त्यामुळे आम्ही शालेय, पुढे महाविद्यालयीन शिक्षणातही अग्रेसर होतो. वालचंद अभियांत्रिकीतून मेकॅनिकलची पदवी घेऊन बाहेर पडलो. उद्योगात यायचं निश्‍चित होतं. नोकरी करीत चिंतामणराव मॅनेजमेंटमध्ये व्यवस्थापन शिकलो. भाऊ अरशदनेही वसंतदादा अभियांत्रिकीत मेकॅनिकल पदवीदर झाला. दोघेही खासगी नोकरी करीत होतो. दरम्यानच्या काळात सौदी अरेबियातील एका स्टील कंपनीत नोकरी मिळाली. पाच वर्षे तिथं होतो. भाऊ अरशदही पुण्यात नोकरी करायचा. नोकरी करीत असतानाच दोघांनीही उद्योग सुरु करायचा निर्णय घेतला. 

सन 1995 मध्ये छोट्या जागेत सुरवात झाली. वीज मंडळातील निवृत्त अधिकारी जंबू खोत यांनी सुरवातीला प्रोत्साहन दिले. मार्केटचा अंदाज घेत दोघेही फिरू लागलो. भाऊ अरशद मार्केटिंगमध्ये कुशल होता. काही दिवसांत बॉयलरची ऑर्डर मिळाली. दीड महिन्यांत ती पूर्ण केली. गुणवत्ता, कामाच्या गतीमुळे समोरची पार्टी खुश झाली. संशोधन-विकासातून अडचणींवर मात करीत उद्योग विस्तारला. निर्मिती, संच मांडणी, देखभाल-दुरूस्ती अशा सेवांमुळे ग्राहक वाढत गेले.

शासकीय दूध संघ, सीटीआरआय म्हैसूर आणि भोपाळ, फूड प्रोसेसिंग युनिटस्‌, डिफेन्स्‌, रेल्वे, कृषी व अभियांत्रिकी महाविद्यालये, रबर, गारमेंट, केमिकल, टेक्‍स्टाईल कंपन्या, पंचतारांकीत हॉटेल्स्‌, रुग्णालये, डेअरी अशा उद्योगांसाठी बॉयलर्स आशियायी-आफ्रिकन देशात जाताहेत. बनवून आम्ही दिले आहेत. दोन दशकांत आशियाई देश, आफ्रिकन देशांत सहा हजारांवर बॉयलर्स पोहोचलेत. 

कायझन तंत्रज्ञान 
कायझन तंत्रज्ञानाचा अंगीकार केला आहे. प्रत्येकाच्या कामाचे मूल्य समान व तितकंच महत्वाचं मानलं. वरीष्ठ-कनिष्ठ भेदभाव संपवला. संशोधन-विकास विभागाचं कंपनीतील अस्तित्व सुरवातीपासून असल्याने नव्या तंत्राची स्विकारार्हता सर्वस्तरावर दिसून आली.  

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: success of the boiler supply industry for many industries in India, including Asian countries