esakal | टीमवर्कमुळेच यशस्वी कारकीर्द : सुहैल शर्मा
sakal

बोलून बातमी शोधा

Successful career due to teamwork: Suhail Sharma

सांगली जिल्ह्यात तीन वर्षांत गुन्हेगारी रोखण्यासह नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात टीमवर्क महत्त्वाचे होते. यामुळेच हे योगदान शक्‍य झाले, असे मत पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी आज येथे व्यक्त केले.

टीमवर्कमुळेच यशस्वी कारकीर्द : सुहैल शर्मा

sakal_logo
By
शैलेश पेटकर


सांगली : जिल्ह्यात तीन वर्षांत गुन्हेगारी रोखण्यासह नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात टीमवर्क महत्त्वाचे होते. यामुळेच हे योगदान शक्‍य झाले, असे मत पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी आज येथे व्यक्त केले. सांगलीच्या अधीक्षकपदी दीक्षित गेडाम यांची नियुक्ती झाली. आज त्यांनी पदभार स्वीकारला. यावेळी शर्मा यांचा निरोप समारंभ घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. 

दरम्यान, जिल्हा पोलिस दलाने श्री. शर्मा यांना वेगळ्या थाटामाटात निरोप दिला. शर्मा यांची सहकुटुंब जीपमधून रॅली काढत त्यांनी बजावलेल्या सेवेला मानवंदना देण्यात आली. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, महापौर गीता सुतार, जिल्हा परिषद अध्यक्ष प्राजक्ता कोरे, सिमरत सुहैल शर्मा, अपर पोलिस अधीक्षक मनीषा दुबुले, उपाधीक्षक संदीपसिंह गिल, अशोक वीरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. 

श्री. शर्मा म्हणाले, ""सांगली जिल्ह्यात पदभार स्वीकारल्यानंतर पोलिस दलाची प्रतिमा उंचावण्यासाठी मी प्राधान्य दिले. यासह गुन्हेगारीला चाप लावण्यासाठी टीमवर्क महत्त्वाचे ठरले. जिल्ह्यातील सर्व पोलिस अधिकारी-कर्मचारी यांचे आणि माझे कुटुंबाचे नाते निर्माण झाले आहे. ते मी कधीच विसरू शकणार नाही. सांगली पोलिस दल कशातही कमी नाही आणि कमी पडणारही नाही. नवे पोलिस अधीक्षकही सांगलीसाठी चांगले योगदान देतील.'' 

नवे अधीक्षक गेडाम यांनीही शर्मा यांच्या कारकीर्दीचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. श्री. शर्मा यांचा पोलिस दलातील अधिकारी व कर्मचारी यांच्याशी चांगला समन्वय झाला होता. त्यामुळे बदली झाली असे समजताच जिल्ह्यातील पोलिस अधिकारी-कर्मचारी त्यांना बदलीनिमित्त निरोप देण्यासाठी मुख्यालयात मोठ्या संख्येने दाखल झाले होते. यावेळी त्यांची जीपमधून रॅली काढण्यात आली.

शर्मा यांनी आपल्या कारकिर्दीत सांगली जिल्ह्यात महत्त्वाचे रस्ते, ठिकाणे सीसी टीव्हीच्या निगराणीखाली आणण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले. महापूर संकटकाळी, तसेच लोकसभा, विधानसभा निवडणूक काळातही कौशल्याने परिस्थिती हाताळली. गुन्हेगारी टोळ्यांच्या मुसक्‍या आवळण्याबरोबरच पोलिस मदत केंद्र आणि आरएफआयही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी पुढाकार घेतला. 

संपादन : युवराज यादव