Sudden entry of bison in the field!
Sudden entry of bison in the field!

खुळा का येडा,,, त्यो बघ लेका आला गवा रेडा...

नेर्ले (जि. सांगली) : येथील काळे पाणंद शेताच्या बहे रस्त्यावरील रानात नांगरट चालू असताना गव्याचे आगमन झाले. या अचानक एन्ट्रीने शेतकऱ्यांचे धाबे दणाणले. काहींची तर बोबडीच वळली. शेतात काम करणाऱ्या महिला, पुरुष यांची पळताभुई थोडी झाली. येथील उपसरपंच विश्वास पाटील यांच्या शेतात नांगरट सुरू असताना हा प्रकार घडला.

आज दुपारी एकच्या सुमारास काळे पानंद रस्ता येथे शेतात नेहमीप्रमाणे शेतीची कामे सुरू होती. उपसरपंच विश्वास पाटील आपल्या शेतात ट्रॅक्‍टरच्या साहाय्याने नांगरट करीत होते. यावेळी अचानक समोरून गव्याचे आगमन झाले. आजूबाजूच्या शेतातील महिला व पुरुषांची घाबरून पळापळ झाली. यावेळी विश्वास पाटील यांनी वेळ न दवडता शिराळा वनपाल अधिकारी रूपाली सागावकर यांना फोन केला व गवा आल्याची माहिती दिली. सौ. सागावकर यांनी वनरक्षक विलास चव्हाण यांना ताबडतोब घटनास्थळी पाठवून दिले. उपस्थित शेतकरी व वनरक्षक यांनी गव्याचा माग काढला. शोधाशोध सुरू केली. शिवार पिंजून काढले, पण तो दाट झाडी व शेताचा आधार घेऊन पसार झाला होता. ट्रॅक्‍टरच्या आवाजाने त्याने दिशा बदलत पळ काढला. 

दरम्यान, नेर्ले परिसरात पहिल्यांदाच गवा दिसल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावाच्या पश्‍चिमेला सुळकीचा एकच डोंगर आहे. त्यामुळे हा गवारेडा एवढ्या आत माणसांच्या वर्दळीच्या भागात शेतात आला कसा? असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे. चांदोली अभयारण्य येथून चाळीस किलोमीटर अंतरावर आहे, तर देवराष्ट्रे येथील अभयारण्य पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर आहे. एवढे अंतर कापत गवा आला असल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. हा गवारेडा भरकटला असावा असा अंदाज वन कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला. गव्याचा शोध वन विभागाच्या वतीने सुरू आहे. 

शेतात जाताना काळजीपूर्वक जावे
नेर्ले परिसरातील शेतकऱ्यांनी शेतात जाताना काळजीपूर्वक जावे. गवा दिसल्यास ताबडतोब वनविभागाला कळवावे. आमच्या भागात पहिल्यांदाच गवा दिसला आहे. 
- विश्वास पाटील, उपसरपंच, नेर्ले 

कळ काढण्याचा प्रयत्न करू नये

लोकांनी अथवा शेतकऱ्यांनी गव्याला दगड, काठ्या मारण्याचा किंवा त्याला पकडण्याचा प्रयत्न करू नये. कळ न काढल्यास तो त्याच्या मार्गाने जाईल. आम्ही त्याची शोधाशोध करतोय. 
- दीपाली सागावकर, वनक्षेत्रपाल, वन विभाग शिराळा  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com