esakal | साखर कारखान्यातील सांडपाणी ९० टक्के शुद्ध करण्यात यश
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूर - साखर कारखान्यात निर्माण होणाऱ्या सांडपाण्याचे उत्प्रेरकाच्या मदतीने व सूर्यप्रकाशाद्वारे होणारे विघटन.

साखर कारखान्यातील सांडपाणी ९० टक्के शुद्ध करण्यात यश

sakal_logo
By
अमृता जोशी

अजित पवारचे संशोधन - प्रयोगाला लीला परशुराम आगाशे विज्ञान संशोधन पुरस्कार

कोल्हापूर - मराठी विज्ञान परिषदेतर्फे झालेल्या विज्ञान संशोधन पुरस्कार स्पर्धेत येथील अजित राजेंद्र पवार याने राज्यस्तरावर पहिले पारितोषिक मिळविले. त्याच्या ‘साखर कारखान्यात निर्माण होणाऱ्या सांडपाण्याचे उत्प्रेरकाच्या मदतीने सूर्यप्रकाशाद्वारे विघटन’ या प्रयोगाला ‘लीला परशुराम आगाशे विज्ञान संशोधन पुरस्कार - २०१६’ मिळाला. 

पुणे येथील आयसर (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च) संस्थेतील संशोधक प्रा. मिलिंद वाटवे यांच्या हस्ते त्याला गौरविले. साखर कारखान्यातून बाहेर पडणारे दूषित सांडपाणी तसेच, टेक्‍स्टाईल इंडस्ट्रीमधील सांडपाणी (यात कापडासाठी वापरले जाणारे डाय असते) यावर प्रक्रिया करण्याचे सोपे तंत्र शोधून काढले आहे. यासाठी टिटॅनियम डायऑक्‍साइड (TiO२) चा उत्प्रेरक (रासायनिक प्रक्रियेला चालना देणारा घटक) म्हणून वापर केला आहे. टिटॅनियम डायऑक्‍साइड पर्यावरणपूरक असून, त्याची रासायनिकदृष्ट्या स्थिरता (स्टॅबिलिटी) जास्त आहे. याचा वापर करून सूर्यप्रकाशाद्वारे कारखान्यातील दूषित सांडपाण्याचे रासायनिक विघटन घडवून आणले. या प्रयोगातून सांडपाण्याचे ९० टक्के शुद्धीकरण करण्यात यश मिळाले आहे. अजित सध्या शिवाजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ नॅनो सायन्स अँड टेक्‍नॉलॉजी विभागात बीएस्सीच्या तृतीय वर्षात शिकत आहे.

सध्या साखर कारखाना किंवा टेक्‍स्टाईल इंडस्ट्रीमध्ये सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रियेसाठी ॲक्‍टिव्हेटेड स्लज प्रोसेस, यू. व्ही. डिसइन्फेक्‍शन, फिल्टरेशन, सेडिमेंटेशन, लाइम ॲडिशन, एअरेशन टॅंक आदी यंत्रणा, तंत्रज्ञान वापरले जाते. या प्रोसेसिंग युनिटचा खर्च कोटींमध्ये आहे. इतक्‍या खर्चानंतरही या सांडपाण्याचा दूषितपणा कमी होऊन ते पिण्यायोग्य बनत नाही. या पार्श्‍वभूमीवर अजित पवारने विकसित केलेल्या तंत्राला महत्त्व आले आहे.

साखर कारखान्यातील, टेक्‍स्टाइल इंडस्ट्रीतून बाहेर पडणाऱ्या दूषित सांडपाण्याचे राज्य शासनाच्या वॉटर टेस्टिंग लॅबमध्ये परीक्षण करून घेतले. कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यात प्रक्रियेनंतरही दूषित घटक बऱ्याच प्रमाणात राहतात. टिटॅनियम डायऑक्‍साइडची ०.३ ग्रॅम पावडर ३०० मिली दूषित पाण्यासाठी वापरली. सांडपाण्याचा उग्र वास, दूषितपणा ९० टक्के कमी झाला. तरीही हे पाणी पिण्यायोग्य नाही. अधिक प्रयोगांतून ते पिण्यायोग्य बनविता येईल. 
- अजित पवार

loading image