यंदा साखर उत्पादन एक कोटी क्विंटलवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sugar factories

यंदा साखर उत्पादन एक कोटी क्विंटलवर

सांगली - सांगली जिल्ह्यात यंदा एक कोटी पाच लाख क्विंटलपेक्षा अधिक साखर उत्पादन झाले आहे. गेल्या काही वर्षांचा हा विक्रम आहे. यापूर्वी ९८ हजार क्विंटल साखर उत्पादन झाले होते. जिल्ह्यातील १३ साखर कारखान्यांनी १७ एप्रिलअखेर ९१ लाख ९४ हजार ४३ टन उसाचे गाळप केले आहे. जिल्ह्याचा सरासरी उतारा ११.४१ टक्के आहे. गाळपात सांगलीतील श्री दत्त इंडिया सर्वात आघाडीवर आहे. १२.४६ लाख क्विंटलहून अधिक साखर उत्पादन झाले आहे. जिल्ह्यात गत वर्षी मोठ्या प्रमाणावर उसाची लागण झाली होती. जिल्ह्यातील सिंचन योजना सुरु आणि द्राक्ष उत्पादकांना नैसर्गिक आपत्तीच्या फटक्यामुळे चालू वर्षीही उसाची मोठ्या प्रमाणावर लागण झाली आहे. पुढील वर्षी आणखी गाळप वाढणार आहे. जिल्ह्यातील पाच साखर कारखाने यंदा बंद राहिल्याचा फटका शेतकऱ्यांना बसला होता. त्यातील तीन कारखाने सुरु होण्याची आशा आहे. त्यात नागेवाडी, तासगाव, कवठेमहांकाळ येथील कारखान्यांचा समावेश आहे.

यंदा ऊस गाळप हंगाम संपत आला तरी मराठवाड्यातच नव्हे तर तर महाराष्ट्रामध्येही अजून गाळपाविना ऊस शिल्लक आहे. राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड साखर कारखान्यांनी सर्व नोंदणीकृत तसेच अनोंदणीकृत ऊसाचे गाळप झाल्याशिवाय कारखाने बंद करू नयेत, असे आदेश दिले होते तरीही अनेक कारखान्यांनी हंगाम बंद केले आहेत. सांगली जिल्ह्यात अजूनही दीड हजार हेक्‍टरवर ऊस शिल्लक आहे. कारखाने बंद होत असल्यामुळे अतिरिक्त उसाचे करायचे काय? असा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर आहे. शिल्लक उसासाठी एकरी एक लाख रुपये अनुदानाची मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे.

जिल्ह्यातील १८ पैकी ५ कारखाने बंद आहेत. १३ कारखान्यांपैकी ११ कारखाने बंद झालेले आहेत. अद्याप दोन कारखाने सुरु असून दीड हजार हेक्टरवरील ऊस अद्यापही शिल्लक आहे. एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यातही कारखाने सुरु ठेवावे लागताहेत. त्यामुळे कारखान्यांनी कमी क्षमतेने चालवावे लागत आहेत. त्यात सोनहिरा, सदगुरू कारखान्यांचा समावेश आहे. सोनहिरा दोन दिवसात बंद होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना यंदा कारखान्याच्या कार्यालयांत चकरा मारूनही तोड मिळत नसल्याने त्रासलेले आहेत. अनेकांच्या उसाला उशिरा तोड मिळत असल्याने साहजिकच परिणाम वजनाच घट झाली आहे. शिवाय तोडणीसाठी मजुरांकडून एकरी चार-पाच हजारांची मागणी होत असल्यामुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी आहे. उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे ऊसतोडणी मजूर आपापल्या गावी परतल्याचे चित्र आहे. यंदा उसाच्या लागणी मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे पुढील वर्षी स्थानिक पातळ्यांवरच ऊसतोडणी टोळ्या कराव्या लागतील. एकमेकाचा ऊस तोडावा लागेल. यंत्राने ऊस तोडणीसाठी किमान ४ फुटावर उसाची लागण आणि एकाच ठिकाणी जादा क्षेत्र असल्यासच तोड लवकर मिळणार आहे. यासाठी मोठ्या शेतकऱ्यांनी स्वतःहून तोडणी यंत्र खरेदी करावी लागणार आहेत.

Web Title: Sugar Production At One Crore Quintals This Year

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top