फड पेटू लागले.. शिवार धुमसू लागले!!

तानाजी टकले
Saturday, 4 April 2020

जाणाऱ्या उसाचा हातातोंडाला आलेला घास, अजूनही शिवारातील शेकडो एकर उभा ऊस..., कोरोनाच्या धास्तीने पळून चाललेल्या टोळ्या, रणरणत उन्ह अन्‌ उर्वरित ऊसतोड मजुरांची घालमेल.. शिवारातील ऊस शिल्लक राहतो की काय या भीतीने ऊसतोडणीसाठी शिवारातील फड पेटू लागले आहेत. 

आष्टा : जाणाऱ्या उसाचा हातातोंडाला आलेला घास, अजूनही शिवारातील शेकडो एकर उभा ऊस..., कोरोनाच्या धास्तीने पळून चाललेल्या टोळ्या, रणरणत उन्ह अन्‌ उर्वरित ऊसतोड मजुरांची घालमेल.. शिवारातील ऊस शिल्लक राहतो की काय या भीतीने ऊसतोडणीसाठी शिवारातील फड पेटू लागले आहेत. 

वाळवा तालुक्‍यातील साखर कारखान्यांचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. तरीही शहरात मात्र अद्याप सुमारे दीडशे एकर ऊस शेतामध्ये उभा असल्याचे चित्र आहे. शेतातील ऊस कारखान्याला जाणार की कष्टाने वाढवलेला ऊस शेतातच राहणार या भीतीने ऊस उत्पादक शेतकरी चिंतातुर झाला आहे. 
सुरवातीला महापुराने छळले, महिनाभर उशिरा सुरू झालेला हंगाम अन्‌ शेवटच्या टप्प्यात कोरोना.. या नैसर्गिक आपत्तीने इथला शेतकरी पुरता मोडत आहे.

महापुरात ही या परिसरातील ऊस शेतीचे मोठे नुकसान झाले. परिसरात ऊसक्षेत्र मोठ्या प्रमाणात म्हणजे सुमारे दहा हजार एकर इतका आहे. गेट केन ऊस वगळता बहुतांश येथील वसंतदादा, सर्वोदय, राजारामबापू हुतात्मा कारखान्याला जातो. हंगामात सुमारे दहा लाख मेट्रिक टनाचे उत्पादन या परिसरातील ऊस शेतीतून होत असल्याचे बोलले जाते. या वर्षीचा हंगाम एक महिना उशिरा सुरू झाला आहे. अनेक टोळ्यांनी ट्रॅक्‍टर मालकांचे फसवणूक केली. कामगार आलेच नाहीत. आलेल्या ऊस टोळ्यावर हंगाम सुरू झाला. आष्टा परिसरात हक्काच्या लिफ्ट इरिगेशन स्कीमा असल्यामुळे येथील ऊस हंगामाच्या शेवटी गतीने तुटतो हे नेहमीचेच चित्र, प्रारंभी मोजक्‍या टोळ्यावर तीस टक्के ऊस तुटला नाही. 

चिंचणी यात्रेनंतर टोळ्यांची संख्या वाढली, पण उन्हाचा वाढता तडाका तोडीचे प्रमाण कमी झाले, फेब्रुवारी मार्च पर्यंत ऊस संपेल ही आशा शेतकऱ्यांना होती. मात्र महिनाभरापासूनच रणरणतं ऊन आणि कोरांनाची धास्तीने ऊसतोड मजुरांची तोडणी बाबत टंगळमंगळ सुरू आहे. बीड, नगर जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांनी तर तोडीच बंद ठेवल्या. अनेकजण गावाकडे परतले, काही परतू लागले आहेत. याचा परिणाम जत सांगोला परिसरातून आलेलांच्या टोळ्यावर होत आहे.

कोरोना विषाणूची धास्ती ऊसतोड मजुरांच्या गावाकडील कुटुंबाने तर कुटुंबाची जास्ती ऊसतोड मजुरांनी घेतली असल्याने तोडीबाबत त्यांची मानसिकताच राहिलेली नाही. परिणामी ऊस गळीत हंगामातील ऊस शिल्लक राहतो की काय अशी स्थिती निर्माण झाल्याने उत्पादक शेतकरी पुरता धास्तावला आहे. कोरोनाची भीती सिल्की उसाचा धोका लक्षात घेऊन कारखान्याने जळीत कपात रद्द करून फड पेटवून तोडण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे शिवारात शेकडो एकर उभा असणारे उसाचे फड पाच दिवसांपासून पेटू लागले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sugarcane field sets fire in valava taluka