या व्यावसायिकांचा हंगाम गेला वाया...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 एप्रिल 2020

उन्हाळ्यात चालणारे सर्व व्यवसाय यावेळी शंभर टक्के ठप्प असणार आहे. पावसाळा सुरु होईपर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव संपूर्ण व्यवहार सुरु होतील का, याविषयी शंका आहेत. त्यामुळे हे सारेच हतबल झाले आहेत. 

सांगली ः रसवंती, मठ्ठा, सरबत विक्रेत्यांसाठी उन्हाळ्याचे चार महिनेच कमाईचे. या काळात दिवसरात्र काम करून हे लोक चांगली कमाई करतात. अन्य हंगामात थोडेफार काम केले तरी वर्षभराचे आर्थिक नियोजन जमते. यावेळी परिस्थिती पूर्ण वेगळी आहे. उन्हाळ्यात चालणारे सर्व व्यवसाय यावेळी शंभर टक्के ठप्प असणार आहे. पावसाळा सुरु होईपर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव संपूर्ण व्यवहार सुरु होतील का, याविषयी शंका आहेत. त्यामुळे हे सारेच हतबल झाले आहेत.

गेल्या चार वर्षांपासून वसंतदादा मार्केट यार्डमध्ये आंबील आणि मठ्ठा विक्रीचा व्यवसाय करणारे सुनिल पाटील म्हणाले, ""पूर्ण हंगामात झालेली उलाढाल आम्हाला वर्षभर उभारी देणारी असते. अन्य काळात आम्ही इतर कामे करतो, मात्र हे चार महिनेच मुख्य कमाईचे असतात. पहिले काही दिवस व्यवसाय चालला, मात्र आता उन्हाळा पुन्हा साधेल, याविषयी शंका आहे.'' 

मिरजेतील प्रसिद्ध मठ्ठा घेऊन विक्री करणारे शार्दूल शिंदे म्हणाले, ""मठ्ठा विक्रीवर चार ते पाच महिने चालणारे शेकडो लोक आहेत. शहरात आणि ग्रामीण भागात या चार महिन्यात लाखो रुपयांची उलाढाल होते. ती सारीच ठप्प आहे. आता पावसाळ्यात दुसरा पर्याय उरणार नाही. कारण, आम्ही तयार मठ्ठा आणून विकायचो. आता पुढील वर्षीच व्यवसाय सुरु होईल, असे वाटतेय.'' 

रसवंतीगृह मालक बंडू पाटील म्हणाले, ""गेल्यावर्षी कर्ज काढून छोटे रसवंती यंत्र घेतले. कनेक्‍शन घेतले. पहिला हंगाम चांगला गेला. चांगले पैसे राहिले. यंदा सारे कर्ज फिटेल, असे वाटले होते. तसे काही होणार नाही. कारण, व्यवसाय ठप्प आहे. तो सुरु होण्याची शक्‍यता मावळताना दिसते आहे. पहिला महिनाभरच व्यवसाय झाला.'' 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sugarcane & other juice sellers summer season wasted