esakal | सांगलीत ऊस दराचे तीन तुकडेच: 2400 चा पहिला हप्ता
sakal

बोलून बातमी शोधा

 Sugarcane rates in three pieces: the first installment of 2400

सांगली जिल्ह्यात ऊस दराचे तीन तुकडे पाडण्याचा निर्णय साखर कारखानदारांनी घेतला असून साऱ्यांनी एकमेकांच्या संमतीने आता तो अमलात आणला आहे. त्यावर राळ उठू नये, यासाठी शेतकऱ्यांकडून संमतीपत्रावर सह्या करून घेतल्या जात आहेत.

सांगलीत ऊस दराचे तीन तुकडेच: 2400 चा पहिला हप्ता

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सांगली : जिल्ह्यात ऊस दराचे तीन तुकडे पाडण्याचा निर्णय साखर कारखानदारांनी घेतला असून साऱ्यांनी एकमेकांच्या संमतीने आता तो अमलात आणला आहे. त्यावर राळ उठू नये, यासाठी शेतकऱ्यांकडून संमतीपत्रावर सह्या करून घेतल्या जात आहेत. पहिला हप्ता 2400 रुपये, जूनमध्ये मशागतीसाठी 200 रुपये आणि दिवाळीसाठी 200 रुपये असे तीन हप्त्यात पैसे देऊ, अशी ग्वाही कारखानदारांनी दिली आहे, मात्र आतापर्यंत दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याबाबत काही कारखानदारांनी केलेली फसवणूक पाहता शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

गेल्या पंधरा ते वीस वर्षांत राज्यातील ऊस दराची कोंडी सातत्याने सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनी फोडली आहे. गेल्या दोन वर्षांत ऊस दर आंदोलनात फारशी हवा राहिली नाही. त्यामुळे कारखानदारांनी मोकळा श्‍वास घेतला होता. या टप्प्यावर कारखानदारांनी पुन्हा दराचे तुकडे पाडले आहेत. शेजारील जिल्ह्यांपेक्षा आणि कर्नाटक सीमावर्ती भागातील कारखान्यांच्या दरापेक्षा हा हप्ता कमी आहे. दुसरा आणि तिसरा हप्ता देऊ, असे सांगितले जात असले तरी त्याविषयी खात्री नसल्याने ऊस उत्पादकांचा गोंधळ उडाला आहे. राजारामबापू कारखाना, क्रांती कारखाना, सोनहिरा कारखाना, विश्‍वास कारखाना या साऱ्यांनी एकच पॅटर्न राबवला आहे. 

ऊस दराचे तीन तुकडे

  • पहिला हप्ता : 2400 रुपये 
  • दुसरा हप्ता : 200 रुपये 
  • तिसरा हप्ता : 200 रुपये 

राजू शेट्टी नाराज, पण शांत 

शेजारील कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कारखान्यांनी 2750 ते 2800 रुपयांची पहिली उचल दिली आहे. त्या तुलनेत सांगली जिल्ह्यात चारशे रुपये कमी दिले जात आहेत. त्याबाबत अनेकांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्याशी संपर्क साधला. ते या प्रक्रियेवर नाराज आहेत, मात्र त्यांनी तूर्त शांत राहण्याचे ठरवले आहे. शेतकरी चळवळ अडचणीत आणायची, मोडायची असे डावपेच आखले जात असल्याने शेट्टींनी थांबा आणि पहा, अशी भूमिका घेतली आहे. 

एफआरपी शंभर टक्के दिली जाईल

सध्याची साखर उद्योगाची स्थिती व कारखान्यांची आर्थिक परिस्थिती पाहता तीन टप्प्यात एफआरपी देणेच योग्य होईल. शेतकऱ्यांनीही त्याला मान्यता दिली आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यात हा पॅटर्न आम्ही राबवत आहोत. एफआरपी शंभर टक्के दिली जाईल, याविषयी खात्री बाळगावी. 

- अरुण लाड, अध्यक्ष, क्रांती साखर कारखाना 

loading image