अवकाळी पावसामुळे आडवा झालेला ऊस | Nipani | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवकाळी पावसामुळे आडवा झालेला ऊस

निपाणी : अवकाळी पावसामुळे आडवा झालेला ऊस

निपाणी : निपाणी तालुक्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून पडणाऱ्या अवेळी पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे. दिवसभर ढगाळ वातावरण, रात्री जोराचा पाऊस या अनपेक्षित पावसामुळे शेतकऱ्यांची दैना उडाली आहे. हा पाऊस रब्बी पिकांसाठी उपयुक्त असला तरी सध्या तालुक्यात सुरू असलेल्या ऊसतोडी बंद होत आहेत. ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण झाल्याने त्याचा परिणाम साखर कारखान्यांच्या गळीत हंगामावर झाला आहे.

आधीच प्रमाणापेक्षा पडलेला जास्त पाऊस अन् आता अनपेक्षितपणे पडणारा पाऊस यामुळे शेतकरी वैतागून गेला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून चिक्कोडी तालुक्यातील सहकारी व खासगी कारखान्यांचा गळीत हंगामास सुरुवात झाली आहे. मात्र ऐन हिवाळ्यात ऊसतोडणी हंगामात पुन्हा एकदा पावसाने व्यत्यय निर्माण केला आहे. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली. २५ आक्टोम्बर दरम्यान तालुक्यात ऊसतोडणी सुरू झाली आहे.

हेही वाचा: अंबासन फाट्यावर अवैध गोवंश वाहतूक करणारा पिकअप पोलीसांच्या ताब्यात

निपाणी तालुक्यातील निपाणीसह बेनाडी, मांगूर, भोज, बेडकिहाळ, खडकलाट, जत्राट, श्रीपेवाडी, पट्टणकुडी, गळतगा, अक्कोळ भागात तीन दिवसापासून ढगाळ वातावरणामुळे उष्णता वाढली असून मध्यरात्री जोराचा पाऊस पडत आहे. शेतात पाणी साचले असून रस्तेही चिखलम झाले आहेत. त्यामुळे ऊस वाहतूक करणारी अवजड वाहने अडकण्याचे प्रकार घडू लागले आहेत. जुलै-ऑगस्ट दरम्यान आलेल्या महापुरामुळे व नदीकाठच्या पट्ट्यातील ऊस पिकावर परिणाम झाला आहे.

उसाची वाढ खुंटली असून ऊस पोकळ होण्यास सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत सुरुवातीलाच पुन्हा एकदा पावसाचे आगमन झाल्याने शेतकरी व ऊसतोड कामगारांवर आस्मानी संकट गडद झाले असून ऊस तोड करता येत नसल्याने तोडणीमजूर आपापल्या छावणीत बसून आहेत. ज्वारी, हरभरा, मका रब्बी हंगामातील पिकांना हा पाऊस उपयुक्त असला तरी ऊसतोड आणि वाहतुकीमध्ये अडथळा निर्माण झाला आहे. पाऊस असाच सुरू राहिला तर साखर कारखान्यांचा गळीत हंगाम काही दिवसासाठी लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गुन्हाळमालक अजूनही शांतच

दिवाळीनंतर तालुक्यातील सुरू होणारी गुन्हाळघरे अजूनही बंद स्थितीत आहेत. अवकाळी पाऊस, मजुरांची कमतरता, गूळ तयार करण्यासाठी येणारा अवाढव्य खर्च व गुळाला मिळत नसलेला योग्य भाव, यामुळे गुऱ्हाळ मालकदेखील अजूनही शांतच आहेत.

loading image
go to top