अंबासन फाट्यावर अवैध गोवंश वाहतूक करणारा पिकअप पोलीसांच्या ताब्यात | nashik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंबासन फाट्यावर अवैध गोवंश वाहतूक करणारा पिकअप पोलीसांच्या ताब्यात

अंबासन फाट्यावर अवैध गोवंश वाहतूक करणारा पिकअप पोलीसांच्या ताब्यात

अंबासन, (जि.नाशिक) : येथील औरंगाबाद, अहवाल राज्य महामार्गावरील चौफुली फाट्यावर पहाटेच्या सुमारास अवैध गोवंश वाहतूक करणारा पिकअप तरूणांच्या मदतीने जायखेडा पोलिसांनी सिनेस्टाईलने ताब्यात घेतला. यात जखमी सात गोवंशाची औषधोपचार करून मालेगाव येथील गोशाळेत रवानगी करत मुक्तता केली. परिसरात गोवंश वाहतूक करणारी वाहने मोठ्या प्रमाणात मिळून येत असल्याचे समोर आले असून पशुप्रेमीमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

कसमादे परिसरात शेतक-यांच्या पाळीव जनावरांवर रात्रीतून डल्ला मारत अवैध गोवंश वाहतूक होत असल्याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होत आहे. यामुळे पशुपालक हैरान झाले आहेत. मालेगाव तालुक्यातील वडणेर, खाकुर्डी, रावळगाव, आघार, अंबासन, ब्राम्हणपाडे, ताहराबाद व इतर गावातील तरूणांसह जायखेडा पोलिसांनी या वाहनांवर नजर ठेवण्याचा निर्धार केला असता सोमवार (ता.२२) पहाटेच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस हवालदार शिवाजी गुंजाळ व उमेश भदाणे गस्तीवर असतांना पिकअप (क्र.एमएच०१, एलए.३८०७) वाहनातून अवैध गोवंश वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली त्यांनी ब्राम्हणपाडे येथील व परिसरातील तरूणांच्या मदतीने सिनेस्टाईलने सदर वाहनाचा पाठलाग केला.

हेही वाचा: अहमदनगर : उदयन गडाखांची मुळा संस्थेत एन्ट्री

पिकअपचा मागील टायर फुटल्यानंतरही सदर वाहनचालक भरधाव तब्बल वीस किलोमीटर वाहन घेऊन पोबारा केला. पाठीमागील वाहने मागे टाकताच अंबासन फाट्यावरील सारदे रस्ताकडे वाहन घेऊन जात असतानाच तरूणांनी पकडली वाहनचालक अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. पोलीसांनी पंचनामा करून गोवंश मालेगाव येथील गोशाळेत रवानगी केली व पिकअप वाहन ताब्यात घेतले.

वरदहस्त कुणाचा?

...गेल्या अनेक दिवसांपासून अवैध जनावरे घेऊन जाणारे वाहने रस्त्यावर दिसून येत आहेत. या जनावरांना अक्षरशः निर्दयपणे कोंबून बिनबोभाट वाहतूक होत आहे. तसेच दिवसाढवळ्या शेतक-यांच्या जनावरांवर टेहळणी करून रात्रीतून जनावरांवर डल्ला मारला जात असल्याचा आरोपही शेतकऱ्यांकडून केला जात आहे. दिवसभरात शेतात काम करून रात्रीची गस्त घालत जनावरांची राखन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आल्याची भावना तरूण शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. या अवैध जनावरे घेऊन जाणाऱ्या वाहनांवर वरदहस्त कुणाचा याची जाळेमुळे प्रशासनाने खोदुन काढली पाहिजेत असा संताप शेतकऱ्यांकडून होत आहे.

तलवारीचा धाक

...पहाटे तरूण शेतकऱ्यांकडून पोलीसांच्या मदतीने वाहन पकडण्यासाठी गेले असता पुढे रस्त्यावर टेहळणी कराणा-या चारचाकी वाहनातील लोकांनी त्यांना तलवारीचा धाक दाखवून घाबरवण्याचा प्रयत्न केल्याची गुप्त चर्चा होत होती. या वाहणाच्या पाठीमागून भरधाव गोवंश वाहतूक करणारी पिकअप येत असल्याचे तरूणांनी सांगितले. मात्र जीवाची पर्वा न करता तरूणांनी गावागावातील तरूणांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधून रस्त्यावर उभे केले आणि अखेरीस अंबासन फाट्यावर वाहन पकडण्यात यश मिळवले या वाहनाची झाडाझडती घेतली असता चालकाच्या सिटाजवळ पाठलाग करणा-यावर हल्ला करण्यासाठी दगडगोटे आढळून आले आहेत. रात्रीतून अवैध गोवंश वाहतूक करणारे तीक्ष्ण हत्यार वापरत असल्याचे निदर्शनास आले असल्याने येत्या काळात मोठा अनर्थ घडवून आणण्याची शक्यता बळावल्याचे घटनेवरून समोर आले आहे.

loading image
go to top