
सागंली - येलूर (ता. वाळवा) येथे सुनील ऊर्फ सोन्या प्रकाश काळे (वय ३६) यांचा धारदार विळ्याने वार करून अज्ञातांनी खून केल्याची घटना आज सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. हा खून अनैतिक संबंधातून दोन ते तीन मारेकऱ्यांनी केला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण आहे.
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गालगतच्या येलूर ते तांदूळवाडी सेवा रस्त्यावर पूर्व बाजूस काळे वस्ती आहे. सुनील काळे हे दुचाकी (एम. एच. १० बी. एच. २२८४) वरून वैरणीचा बिंडा घेऊन शेडवर आले. तो बिंडा सोडण्याच्या तयारीत असताना त्यांच्यावर अज्ञातांनी हल्ला चढवला. धारदार विळ्याने डोक्यावर, मानेवर, हातावर वर्मी घाव लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. आरडाओरडा झाल्याने महामार्गावरील प्रवाशांनी व वस्तीवरील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. सुनील काळे यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे त्यांना दिसले. घडलेल्या प्रकाराची माहिती देण्यास सुरुवातीला कोणीच पुढे आले नाही. सायंकाळी सहा वाजता खुनाची बातमी पसरली. खुनाची माहिती मिळताच कुरळप पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. काटे व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
सुनील हे येलूर येथील शिवाजीनगर भागात राहायला आहेत. पत्नी वंदना, मुलगी साक्षी, मुलगा श्रीवर्धन, आई लक्ष्मी असा परिवार आहे. ते स्वतःची शेती सांभाळत शेतमजुरीचीही कामे करत होते. आज मजुरीचे काम करुन वैरण घेऊन महामार्गालगत असणाऱ्या शेडवरील जनावरांजवळ आले. गाडी उभी करुन वैरण उतरवण्याच्या तयारीत असतानाच त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. दरम्यान, सुनील काळे यांचा खून अनैतिक संबंधातून झाला असावा तसेच हल्लेखोर तीन ते चार जण असावेत, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.