सांगलीतही शेतकरी आंदोलनास पाठिंबा; बाजार समित्याही आज बंद

विष्णू मोहिते
Tuesday, 8 December 2020

कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलनाला महाविकास आघाडीतील शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससह आम आदमी पार्टी, जनता दल (धर्मनिरपेक्ष), भाकप, माकप, किसान सभा, स्वाभिमानी शेतकरी संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

सांगली ः कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी संयुक्त शेतकरी संघटनांनी उद्या (ता. 8) "भारत बंद'ची हाक दिली आहे. या बंदमध्ये महाविकास आघाडीतील शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससह आम आदमी पार्टी, जनता दल (धर्मनिरपेक्ष), भाकप, माकप, किसान सभा, स्वाभिमानी शेतकरी संघटनांनी पाठिंबा दिला आहे. भाजीपाला, पानपट्टी संघटना, बाजार समित्या बंद राहणार आहेत. जिल्ह्यातील बॅंक कर्मचारी आणि व्यापाऱ्यांचा भाजपला पाठिंबा दिला आहे. व्यापाऱ्यांनी बंदबाबत वैयक्तिक निर्णय घ्यावा, असे स्पष्ट केले आहे. सांगलीतील स्टेशन चौकातून सकाळी दहा वाजता मोटारसायकल फेरी काढण्यात येणार आहे. 

केंद सरकारच्या नव्या कृषी कायद्यामुळे शेतमालाच्या हमी भावाबाबत शंका निर्माण झाल्याने शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. दिल्लीत गेल्या बारा दिवसांपासून देशातील अनेक शेतकऱ्यांनी दिल्लीत ठिय्या आंदोलन करत आहेत. केंद्राने केलेले शेतकऱ्यांसंबधीचे कायदे रद्द करावेत, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. केंद्र सरकारबरोबरील चर्चा निष्फळ ठरत आहेत. मंगळवारी "भारत बंद'चा निर्णय शेतकरी समन्वय समितीने घेतला आहे. बंदला महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीनेही पाठिंबा दिला आहे. संयुक्त शेतकरी संघटनांसह राजकीय पक्षांनी बंदला पाठिंबा दिला असल्याने गावागावात बंद ठेवण्याबाबतचे आवाहन केले आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीसह जिल्ह्यातील सात बाजार समित्या बंद राहणार आहेत. 

चौकट 
शरद जोशी, रघुनाथदादा, रयत क्रांती बंदमध्ये सहभागी नाही 
कृषी कायद्याविरोधात बळीराजाला पाठिंबा देण्यासाठी संयुक्त शेतकरी संघटनांसह राजकीय पक्षांनी पुकारलेल्या "भारत बंद'मध्ये शरद जोशीप्रणित शेतकरी संघटना, रघुनाथ पाटील आणि रयत क्रांती संघटना सहभागी होणार नाहीत. नवीन कायदे रद्द झाल्यास शेतकऱ्यांना व्यापार आणि स्वातंत्र्याचा मार्ग कायमस्वरुपी बंद होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी "भारत बंद'मध्ये सहभागी होऊ नये, असे आवाहन केले आहे. 
... 
पोलिसांचा बंदोबस्त तैनात 
आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली. अप्पर पोलिस अधीक्षक, सात उपाधीक्षक, 11 निरीक्षक, 54 सहायक निरीक्षक आणि उपनिरीक्षक, 694 कर्मचारी, 789 होमगार्ड आणि राज्य राखीव दलाची एक तुकडी बंदोबस्तात सहभागी असेल. 

संपादन : युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Support for Delhi farmers' movement in Sangli too; Market committee also will be closed today