माता, बालमृत्यू शून्य टक्क्यासाठी प्रयत्न करा; सुरेश खाडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Suresh Khade statement Strive for zero percent child mortality and mother death sangli

माता, बालमृत्यू शून्य टक्क्यासाठी प्रयत्न करा; सुरेश खाडे

सांगली : कुटुंबाची काळजी घेताना महिला स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. महिला सुदृढ असल्यास कुटुंब, समाज, गाव व देश सुदृढ होतो. त्यासाठी ‘माता सुरक्षित, तर घर सुरक्षित’ या अभियानाचा लाभ घेऊन सर्व महिलांनी आरोग्याची तपासणी करून घ्यावी. आरोग्य विभागाने माता व बालमृत्यू प्रमाण शून्य टक्के करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करावेत, असे आवाहन कामगारमंत्री तथा पालकमंत्री सुरेश खाडे यांनी केले.

जिल्हा परिषद आरोग्य विभाग व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने आज मिरज येथे ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियान व ‘स्मार्ट पीएचसी’अंतर्गत आरोग्य तपासणी आणि जनजागृतीस प्रारंभ झाला. यावेळी खासदार संजय पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष प्राजक्ता कोरे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने आदी उपस्थित होते.

खासदार संजय पाटील म्हणाले, आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेला हा अतिशय चांगला उपक्रम आहे. आरोग्य विभागाच्या वतीने घरोघरी जाऊन सर्व्हे करून डेटा हाती आल्यानंतर उपचारासाठी वेगवेगळ्या फंडांतून मदत करण्यासाठी प्रयत्न करू.जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ ही मोहीम सुरू आहे. आरोग्याचा मूळ आधार पोषण हाच आहे. महिलांनी त्यांच्या पोषणावर जास्त भर देणे गरजेचे आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले, आरोग्य विभागाच्यावतीने महिलांसाठी जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांमध्ये २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर दरम्यान ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील १८ वर्षांवरील सर्व महिला, माता, गरोदर स्त्रियांची आरोग्य तपासणी, प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सुविधा करून देणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.यावेळी स्मार्ट पीएचसी जनजागृती पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मोनिका करंदीकर यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी आभार मानले. या कार्यक्रमास आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, गरोदर माता, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.