शस्त्रक्रिया आणि तीही 115 व्या वर्षी; सांगलीत डॉ. खोचीकर यांनी केली शस्त्रक्रिया

Surgery on 115th year old man; Dr. Sanglit Khochikar performed the surgery
Surgery on 115th year old man; Dr. Sanglit Khochikar performed the surgery

सांगली : त्यांना लाभलेय तब्बल 115 वर्षांचे आयुष्यमान... हाच मोठा चमत्कार. त्यात पुन्हा या वयात प्रोस्टेट ग्रंथीची शस्त्रक्रिया म्हणजे मृत्यूच्या प्रवेशद्वारात जाणंच. पण सांगलीत महिन्यापूर्वी ही शस्त्रक्रिया पार पडली. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे युरॉलॉजिस्ट मकरंद खोचीकर यांनी ही यशस्वी कामगिरी पार पाडली. आणि हे भाग्यवान रुग्ण आहेत हजरत हाजी अली शहा कादरी. धारवाड येथील हजरत हाजी सय्यद मेहबुब अली शहा कादरी चिस्ती ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष असलेल्या कादरी यांना मुस्लिम धर्मीयांसह धारवाड पंचक्रोशीत आदराचे स्थान आहे. 

प्रोस्टेट ग्रंथीचा आजार हा सर्वसाधारणपणे साठीनंतर सर्वच पुरुषांना उद्‌भवतो. त्यातली 40 ते 80 ग्रॅमपर्यंतच्या ग्रंथीची शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे होतात. मात्र डॉ. खोचीकर यांची ख्याती अशी की अडीचशे तीनशे ग्रॅमपर्यंतच्या शस्त्रक्रियाही त्यांनी दुर्बिणीद्वारे करून यशस्वी केल्या आहेत. त्यासाठी केवळ महाराष्ट्रासह जगभरातून त्यांच्याकडे रुग्ण येत असतात. अली शाह कादरी हे रुग्ण त्यापैकीच एक. 

कादरी ही असामीच और. त्यांचा पूर्वेइतिहासच मोठा रंजक. त्यांचे वडील 1905 मध्ये बगदादहून भारतात आले आणि कर्नाटकात स्थायिक झाले. तिथेच त्यांचा जन्म झाला. तो कालखंड ब्रिटीश राजवटीचा. त्याकाळी ते ब्रिटीश इंडियन आर्मीत भरती झाले. दुसऱ्या महायुद्धांसह अनेक सैनिक मोहिमांचे प्रत्यक्ष साक्षीदार असलेले कादरी आता आधी ब्रिटीश आणि आता भारत सरकारची सेवानिवृत्तधारक आहेत. त्यांच्या जन्मातारखेच्या सर्व पुराव्यांची कर्नाटक सरकारच्या दप्तरी अचूक नोंद आहे.

इतकेच नव्हे तर शंभर वर्षे पूर्ण झाल्यानंतर निवडणूक आयोगाने त्यांचा प्रमाणपत्र देऊन विशेष सन्मान केला आहे. त्यानंतरही त्यांनी तीन सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान केलेय. 

ेचेन्नई बंगळूर येथील तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार गेल्या महिन्यात ते डॉ. खोचीकर यांच्याकडे आले होते. 12 नोव्हेंबरला अवघ्या तासात शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर चार दिवसांत डिसचार्ज मिळाला. आणि दोन दिवसांपूर्वी हाजी कादरी सांगलीत पुन्हा खोचीकर यांच्याकडे फेरतपासणीसाठी आले होते. त्यावेळी त्यांनी सुहास्य मुद्रेने "डॉक्‍टर वंडरफुल' अशी प्रतिक्रिया दिली. हीच माझ्यासाठी पोहोच असल्याचे डॉ. खोचीकर यांनी "सकाळ'ला सांगितले. ते म्हणाले,""आजवर तीस हजारांवर शस्त्रक्रिया केल्या, मात्र हा अनुभव मात्र कस पाहणारा होता. कारण पंचवीस वर्षांपूर्वी त्यांची मणक्‍याची शस्त्रक्रिया झाली असल्याने या वयात त्यांना भूल देणे अवघड होते. ती कामगिरी डॉ. सुनील पाटील यांनी पार पाडली. कादरी यांनी स्वतःच्या डोळ्याने आपली शस्त्रक्रिया स्क्रीनवरही पाहिली. महिन्यानंतचे समाधानकारक रिझल्ट मलाही अपूर्व आनंद देणारे आहेत.'' 

या शस्त्रक्रियेसाठी डॉ. मिलिंद परीख, डॉ. आनंद मालाणी, डॉ. श्रीवास्तव, डॉ. विराज लोकूर यांचेही सहकार्य लाभल्याचे डॉ. खोचीकर यांनी "सकाळ'ला आवर्जून सांगितले. 

अगर जन्नत जानाही है तो आपके हात जाऊँ
या अवघड शस्त्रक्रियेदरम्यानच मृत्यू होऊ शकतो अशी स्पष्ट कल्पना कादरी आणि त्यांच्या नातेवाईकांना दिली होती. शस्त्रक्रियेवेळी त्यांच्या पाचव्या पिढीतील प्रतिनिधींसह सुमारे पन्नासांवर नातलग सांगलीत हजर होते. शस्त्रक्रियेपूर्वी समुपदेशनावेळी कादरी यांना धोक्‍यांची माहिती दिली असता त्यांनी दिलेली प्रतिक्रिया रुग्ण आणि डॉक्‍टर यांच्यातील विश्‍वास किती असावा याचे आदर्श उदाहरण होते. या मोठ्या वयाचा आणि तितक्‍याच मोठ्या दिलाचा माणूस डॉ. खोचीकर यांना म्हणाला,""अगर जन्नत जानाही है तो आपले हात जाऊ... मेरा फैसला आपकेही हात होगा.'' 

संपादन : युवराज यादव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com