
स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह अन्य शेतकरी संघटनांनी साखर कारखान्यांनी पहिल्यांदा ऊसदर जाहीर करावा, मगच तोडी सुरु कराव्यात असा इशारा दिला आहे.
कडेगाव ( सांगली ) - ऊस दराबाबत आंदोलनाची पहिली ठिणगी आज कडेगाव तालुक्यात पडली. कडेपूर, वांगी (ता. कडेगाव) व आंधळी (ता. पलूस) येथे ऊस दर जाहीर न करता ऊसतोड करुन ऊस कारखान्याकडे घेऊन जाणाऱ्या उदगिरी शुगर कारखान्याच्या ट्रॅक्टरच्या चाकातील हवा आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोडली. तसेच ऊस दराची कोंडी फुटल्याशिवाय कारखान्यांना कांडे तोडू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानाच्या आंदोलकांनी यावेळी दिला.
चालू हंगामासाठी जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांनी आपले गळीत हंगाम सुरु केले आहेत. तर यावर्षी उसाचे क्षेत्र कमी असल्याने त्याचा परिणाम कारखान्यांच्या गाळपावर होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त गाळप करण्यासाठी अनेक कारखान्यांनी आपला प्रतिटन ऊसदर जाहीर न करताच ऊस तोडी सुरु करुन गाळपाला सुरुवात केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह अन्य शेतकरी संघटनांनी साखर कारखान्यांनी पहिल्यांदा ऊसदर जाहीर करावा, मगच तोडी सुरु कराव्यात असा इशारा दिला आहे.
जयसिंगपूरात जाहीर होणार दर
स्वाभिमानीने शनिवारी (ता. 23) जयसिंगपूर येथे ऊस परिषदचे आयोजन केले आहे. त्यामध्ये जो ऊसदर जाहीर होईल. त्यानंतरच शेतकऱ्यांनी ऊस तोडी घ्याव्यात, असे आवाहन यापूर्वीच केले आहे. परंतु खानापूर तालुक्यातील बामणी - पारे येथील उदगिरी शुगर या साखर कारखान्याने चालू गळीत हंगामातील प्रतिटन उसाचा दर जाहीर न करता कडेगाव व पलूस तालुक्यात उसाच्या तोडी सुरु केल्या आहेत. तर आज हा तोडणी केलेला ऊस, वांगी व आंधळी येथून कारखान्याकडे घेवून निघालेल्या ट्रॅक्टरच्या चाकातील हवा स्वाभिमानीचे नेते संदिप राजोबा, जिल्हाध्यक्ष पोपट मोरे, धनंजय पाटील आदींनी सोडली.
तसेच ऊस दाराची कोंडी फुटल्याशिवाय कारखान्यांना कांडे तोडू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानाच्या आंदोलकांनी यावेळी दिला. तर ऊसदराची कोंडी फुटल्याशिवाय शेतकऱ्यांनीही ऊसतोडी घेवू नयेत. असे आवाहन स्वाभिमानीचे संदीप राजोबा व पोपट मोरे यांनी केले आहे.
हेही वाचा -