स्वाभिमानी संघटनेने साखर कारखानदारांना दिला 'हा' इशारा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंधर पाटील म्हणाले, पूरस्थितीमुळे उसाचे नुकसान झाले आहे. यंदाच्या हंगामात कोणत्याही परिस्थितीत एक रकमी एफआरपी मिळालीच पाहिजे. याशिवाय एफआरपीपेक्षा जास्तीत जास्त दर दिला जावा. यावर ऊस परिषदेमध्ये निर्णय घेतला जाणार आहे. 

कोल्हापूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद होईपर्यंत कारखाने बंद ठेवा. एफआरपीचे तुकडे करण्याची भाषा कधीही सहन करणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज दिला. तसेच एकवेळ आमचे तुकडे पडतील, पण एफआरपीचे तुकडे पडू देणार नाही. प्रत्येक साखर कारखान्याने एफआरपी वरती किती रक्कम देणार हे जाहीर करावे, अशी मागणी केली. 

यावर्षीच्या गळीत हंगामासह शासकीय विश्रामगृहात साखर कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये ऊस दरासाठी बैठक झाली. या बैठकीत ठोस निर्णय झाला नसल्याने सोमवारी (ता. 25) पुन्हा बैठक घेतली जाणार आहे. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंधर पाटील म्हणाले, पूरस्थितीमुळे उसाचे नुकसान झाले आहे. यंदाच्या हंगामात कोणत्याही परिस्थितीत एक रकमी एफआरपी मिळालीच पाहिजे. याशिवाय एफआरपीपेक्षा जास्तीत जास्त दर दिला जावा. यावर ऊस परिषदेमध्ये निर्णय घेतला जाणार आहे. 

कारखानदारांची बैठक २५ तारखेस

योग्य दर मिळाल्याशिवाय ऊस तोड सुरु करणार नाही, अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतल्याने ऊस दराच्या तोडग्यासाठी बोलावलेली बैठक निर्णया विना संपली. कारखानदारांनीही या मागणीबाबत फारसे भाष्य न केल्याने पुढील बैठक 25 तारखेस घेण्यात येणार असल्याची माहिती कारखाना प्रतिनिधींनी दिली. तोडगा न निघल्याने ऊस हंगाम सुरळीत होण्याबाबतचे त्रांगडे कायम राहिले आहे. 

कारखानदारांच्या वतीने आमदार प्रकाश आवाडे, आमदार सतेज पाटील, गणपतराव पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, सावकार मादनाईक यांच्याशी चर्चा केली. कारखानदारांनी एक रकमी एफआरपी देण्याबाबत असमर्थता व्यक्त केल्याने बैठकीचा सूर पालटला.

एफआरपी एक रक्कमी देणे अशक्य

सध्या उसाची परिस्थिती बिकट आहे. यामुळे कारखानदारांचे व शेतकऱ्यांचेही नुकसान होवू नये, कारखाने व्यवस्थित चालावेत या भूमिकेतून आम्ही संघटनेच्या कार्यकर्त्यांना बैठकीस बोलावल्याचे श्री पाटील व श्री आवाडे यांनी स्पष्ट केले. गेल्या वर्षी साखर दर, व कारखान्यांच्या कर्जाबाबत विपरीत परिस्थिती असल्याने यंदा एफआरपी एक रक्कमी देणे शक्य होणार नाही. स्वाभिमानीच्या प्रतिनिधींचे म्हणने आम्ही ऐकून घेतले. त्यांची ऊस परिषद 23 तारखेस होणार आहे. यानंतरच आम्ही आमची भूमिका स्पष्ट करु असे त्यांनी सांगितले.

कारखानदारांच्यात एकवाक्‍यतेचा अभाव 

बैठक सुरु असतानाच कारखांने बंद करण्यावरुन काही कारखानदारांच्यात मतभेद दिसून आले. काही कारखान्यांनी कारखाना सुरु करणेबाबत तर काहींनी बंद ठेवण्याची भूमिका घेतली. यामुळे या बैठकीत निर्णय होइपर्यंत कारखांने बंद ठेवायचे की सुरु ठेवायचे याचा निर्णय होवू शकला नाही. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Swabhimani Farmers Organisation And Sugar Factory Directors Meeting