'स्वाभिमानी' जाळणार फसव्या कारखानदारांचे पुतळे  

विष्णू मोहिते 
Saturday, 2 January 2021

जिल्ह्यातील सोनहिरा, उदगिरी व दालमिया वगळता सर्व कारखानदारांनी एकरकमी एफआरपी देण्याचा शब्द पाळला नाही. कारखानदार लबाड आहेत.

सांगली : जिल्ह्यातील सोनहिरा, उदगिरी व दालमिया वगळता सर्व कारखानदारांनी एकरकमी एफआरपी देण्याचा शब्द पाळला नाही. कारखानदार लबाड आहेत. रविवारपासून ( ता. 3)लबाड आणि फसव्या कारखानदारांचे पुतळे जाळण्याचे व गाव्हाणीत उड्या घेण्याचे आंदोलन सुरू करणार आहे, अशी माहिती स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली. 

खराडे म्हणाले, कडेगाव येथे गत महिन्यात संघटनेचे पदधिकारी, कारखानदारांची संयुक्त बैठक झाली. आमदार मोहनराव कदम, विजय पाटील, उमेश जोशी, धारूसो यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. त्या बैठकीत सर्वांनी एकरकमी एफआरपी देण्याचे कबूल केले होते, मात्र त्यांनी शब्द फिरवला. तीन कारखाने वगळता सर्वांनी एकरकमी एफआरपी न देता 2500 रुपये पहिला हप्ता जमा केला आहे. 

ही शेतकऱ्यांशी गद्दीरी आहे. शेतकऱ्याच्या चुलीत पाणी ओतण्याचा प्रकार आहे. या विरोधात आम्ही रस्त्यावरची आणि न्यायालयीन लदाई लढणार आहोत. शब्द न पाळणाऱ्या कारखानदारांचे पुतळे जाळण्याचे आणि गव्हाणीत उड्या घेण्याचे आंदोलन सुरू करणार आहे. त्याच बरोबर साखर आयुक्तांकडेही तक्रार करणार आहोत. ऊस गाळप झाल्यानंतर 14 दिवसात बिल देणे बंधन कारक आहे. मात्र दोन दीड महिन्यानंतर 2500 जमा केल्याने संघर्ष अटळ आहे. 

"सबुध्दी दे आंदोलन.... 
कडेगाव येथे कारखाना पदाधिकारी उपस्थित होते, मात्र त्यांनी शब्द पाळला नाही त्याच्या घरासमोर भजन करण्यात येईल. त्यांना "सबुध्दी दे,' असे साकडे घातले जाईल असे श्री. खराडे यांनी सांगितले. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'Swabhimani' will burn statues of fraudulent manufacturers