फडणवीसांच्या सभेत कोंबड्या उधळण्यास निघालेली स्वाभिमानीची यात्रा रोखली...पोलिस आणि कार्यकर्त्यांत झटापट : 25 जणांना घेतले ताब्यात 

घनश्‍याम नवाथे
Sunday, 27 December 2020

सांगली- इस्लामपूर येथे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत कडकनाथ कोंबड्या उधळण्याचा इशारा देणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी सांगलीत स्टेशन चौकात रोखले. कडकनाथ संघर्ष यात्रा रोखताना स्वाभिमानीचे पदाधिकारी-कार्यकर्ते आणि पोलिसांची झटापट झाली. पोलिसांनी जिल्हाध्यक्ष महेश खराडेसह 25 जणांना ताब्यात घेतले. 

केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्याच्या समर्थनार्थ माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी आत्मनिर्भर यात्रा जिल्ह्यात शुक्रवारी सुरू केली. या यात्रेचा समारोप माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत इस्लामपूर येथे रविवारी सायंकाळी होणार आहे. तत्पूर्वी आत्मनिर्भर यात्रेच्या निमित्ताने स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी एकमेकांवर केलेल्या टिकेवरून राजकीय वातावरण तापले होते. आत्मनिर्भर यात्रेत विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्या सभेत कडकनाथ कोंबड्या उधळण्याचा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष खराडे यांनी दिला होता. त्यासाठी सांगलीतील स्टेशन चौकातून कडकनाथ संघर्ष यात्रा आयोजित केली होती. 

दुपारी साडे बाराच्या सुमारास जिल्हाध्यक्ष खराडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते कडकनाथ कोंबड्यासह स्टेशन चौकात जमले होते. त्यांनी यात्रा काढण्यापूर्वीच सांगली शहर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्यास सुरवात केली. त्यामुळे कार्यकर्ते आणि पोलिस यांच्यात झटापट झाली. स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. कडकनाथ कोंबड्या उंचावून कार्यकर्त्यांनी निषेध केला. त्यामुळे स्टेशन चौकात एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी जिल्हाध्यक्ष खराडे यांच्यासह 25 जणांना ताब्यात घेऊन शहर पोलिस ठाण्यात आणले. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Swabhimani's yatra to scatter chickens stopped at Fadnavis meeting. Police and activists clash: 25 arrested