
पिकांचे वाळवण सुरू; पोटकालवेही राहत आहेत कोरडेच
वांगी (सांगली) : ताकारी उपसा जलसिंचन योजना सुरू होऊन चार दिवस उलटले. सतत बिघाड होऊन पंप बंद पडत असल्याने लाभक्षेत्रातील पिकांचे वाळवण सुरूच आहे. या प्रकाराने सुरू होणाऱ्या पंपांचे पाणी मुख्य कालव्यातच मुरत आहे. पोटकालवे कोरडेच राहत आहेत.
ताकारी योजनेच्या लाभक्षेत्रात तीन आठवड्यांपासून टंचाई निर्माण झाली होती. बहुतांश रब्बी पिकांचे आणि बारमाही बागाईत पिकांचे पाण्याअभावी नुकसान झाले. दरवेळी नुकसान करुनच पाणी सोडण्याच्या पाटबंधारेच्या धोरणाला छेद मिळून जिकीरीच्या वेळी पहिले पाणीआवर्तन गुरुवार (ता. १०) पासून सुरु करण्याचे सोपस्कार पाटबंधारेने पार पाडले. कृष्णा नदीतील पाणीपातळीचा अंदाज न घेता सुरवातीला एकच पंप सुरु करुन मुख्य कालव्याची बोळवण करण्यात आली. नंतर वरचेवर पंप वाढवण्याचा प्रयत्न झाला. मात्र पंप सलगपणे सुरु राहत नाहीत. अगदी २० कि. मी. वर वांगीपर्यंत पाणी पोहोचेपर्यंत मागे सर्व पंप बंद पडत आहेत. संपूर्ण पाणी मुख्य कालव्यातच मुरते आहे. असा प्रकार पाच दिवस सुरु आहे.
हेही वाचा- हृदयद्रावक: आईने दोन मुलींसह केली आत्महत्या; नवऱ्याने फोडला हंबरडा -
ताकारी पाणी आवर्तनाच्या अनियमिततेचा फटका दरवेळी शेतकऱ्यांना बसतो. याहीवेळी पाणी यायला १५ दिवस उशीर झाला. लाभक्षेत्रातील वाढलेल्या बारमाही व रब्बी सिंचनक्षेत्रासाठी जमीनीतून प्रचंड उपसा होत असल्याने सर्वच भागात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले. पाणीपातळी खालावण्यापूर्वीच ताकारी योजना सुरु करुन शेतीपिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांतून होती.
कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी हस्तक्षेप करुन पाणी सोडण्याचे आदेश दिले. ताकारी योजना सध्या कागदावर सुरु आहे. पाण्याची वाट पाहत शेतकरी रात्रंदिवस कालव्यावर येरझा-या घालत आहेत. अखंडपणे पाणी कधी सुरु राहणार याबाबत पाटबंधारे कर्मचारीच साशंक आहेत. पिकांना पाणी मिळून होरपळ कधी थांबणार याची चिंता शेतकऱ्यांना आहे.
सध्या सर्वत्रच टंचाईने गंभीर रूप धारण केल्याने पाण्यासाठी वाद वाढण्याची शक्यता आहे. पोटकालव्यातून पूर्ण क्षमतेने पाणी वाहत नाही. या पाण्याचा पिण्यासह, बारमाही पिके जगवण्यासाठी तसेच उन्हाळी हंगामातील पेरण्यासाठी होणार आहे. मात्र पाणी निरंतर सुरु राहण्यासाठी पाटबंधारेने काळजीपूर्वक नियोजन करणे अपेक्षित आहे.
ताकारी योजनेला कोयना जलविद्युत प्रकल्पातून होणारा वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. पंप बंद होत आहेत. वरिष्ठ पातळीवर बोलणी झाली आहेत. सोमवारी (ता. १४) सायंकाळपासून अखंडपणे आठ पंप सुरू होतील. पाणी सर्वांना पूर्ण दाबाने मिळेल.
- संजय पाटील, शाखा अभियंता (ताकारी)
संपादन- अर्चना बनगे