तासगाव कारखान्याच्या "एफआरपी'ची बैठक निष्फळ 

रवींद्र माने 
Friday, 8 January 2021

तासगाव कारखान्याच्या "एफआरपी'बाबत स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि कारखाना प्रशासन यांच्यात तासगाव पोलिस ठाण्यात झालेली चर्चा निष्फळ ठरली.

तासगाव : तासगाव कारखान्याच्या "एफआरपी'बाबत स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि कारखाना प्रशासन यांच्यात तासगाव पोलिस ठाण्यात झालेली चर्चा निष्फळ ठरली. शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते ठोस निर्णय द्यावा म्हणून आक्रमक राहिले, तर शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय कारखाना घेईल, अशी भूमिका तासगाव कारखान्याच्या वतीने कार्यकारी संचालक आर. डी. पाटील यांनी मांडली. मात्र चर्चेतून कोणताही निर्णय झाला नाही. 

तासगाव कारखान्याकडून शेतकऱ्यांना उसाची एकरकमी एफआरपी मिळावी, अन्यथा आंदोलनाची भूमिका "स्वाभिमानी'ने घेतली आहे. या पार्श्वभूमीवर तासगाव पोलिस ठाण्यात तासगाव कारखाना आणि शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते यांच्यात समन्वयासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पोलिस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे, कारखान्याचे कार्यकारी संचालक रवींद्र पाटील, संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप राजोबा, तालुका अध्यक्ष जोतिराम जाधव यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. 

दालमिया उदगिरी, सोनहिरा कारखान्याप्रमाणे तासगावने ही एकरकमी एफआरपी द्यावी. त्याबाबत कोणत्याही सबबी देऊ नयेत अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मांडण्यात आली. मात्र कारखाना प्रशासनाच्यावतीने चर्चेला आलेले रवींद्र पाटील यांनी कारखाना नुकताच सुरू झाला असून, अन्य कारखान्यांचे "एफआरपी'बाबतचे सूत्र लावू नये. तासगाव कारखान्याने 2850 रुपये दर जाहीर केला आहे. कारखाना शेतकरी हिताची भूमिका घेईल असे मत मांडले. मात्र काहीही ठोस निर्णय न होता चर्चा निष्फळ ठरली.

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tasgaon factory's FRP meeting fails