तासगाव : पळविलेले नवजात बालक साडेसात तासांत आईच्या कुशीत

तातडीने ही घटना तासगाव पोलिसांना कळविण्यात आली.
तासगाव
तासगाव sakal

तासगाव : येथील सिद्धेश्वर चौक परिसरातील सरस्वती आनंद हॉस्पिटलमध्ये नुकत्याच कामावर रुजू झालेल्या परिचािरकेने हॉस्पिटलमधून एक दिवसाचे नवजात बालक पळवून नेल्यावर अवघ्या साडेसात तासांत त्या बाळासह महिलेला ताब्यात घेण्यात यश मिळाले. कुशीत बाळ आल्यावर अखंड रडणाऱ्या त्या आईच्या डोळ्यांतून पुन्हा आनंदाश्रू वाहू लागले. बाळ ताब्यात देताना पोलिसही गहिवरले!

चित्रपटाच्या कथानकाला लाजवेल, असा धक्कादायक प्रकार आज सकाळी पावणेनऊला तासगाव शहरात घडला. डॉ. अंजली पाटील यांच्या सरस्वती आनंद हॉस्पिटलमध्ये चिंचणी (ता. तासगाव) येथील हर्षदा शरद भोसले ही महिला प्रसूतीसाठी शुक्रवारी (ता. २२) दाखल झाली होती. त्यांना मुलगा झाला होता. दरम्यान, आज सकाळी आठच्या सुमारास नुकतीच दोन दिवसांपूर्वी कामावर आलेल्या स्वाती छबूराव माने (वय ३०, रा. येडेमच्छिंद्र, ता. वाळवा; मूळ रा. मोहोळ, जि. सोलापूर) हिने डॉक्टरांना दाखविण्यासाठी म्हणून बाळ आईकडून घेतले आणि ही महिला बाळासह गायब झाल्याने एकच हलकल्लोळ उडाला.

तातडीने ही घटना तासगाव पोलिसांना कळविण्यात आली. हॉस्पिटलमध्ये सीसीटीव्ही नसल्याने बाजूच्या दुकानातील सीसीटीव्हीची तपासणी केली असता संशयित महिला हॉस्पिटलमधून खांद्याला पर्स आणि हातातील पिशवीतून बाळाला घेऊन जाताना दिसली. महिलेच्या नावाशिवाय कोणताही पुरावा नव्हता. केवळ मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांची चक्रे हलली.

दरम्यान, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सागर टिंगरे यांना ही महिला भाड्याची गाडी करून विट्याला गेल्याचे समजले. त्यावर विटा पोलिस सक्रिय झाले. तेथून ही महिला रिक्षाने गेल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी येडेमच्छिंद्र येथून बाळासह स्वाती माने हिला ताब्यात घेतले. पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या अथक प्रयत्नांना साडेसात तासांनंतर यश मिळाले. बाळ सुखरूप असल्याची माहिती मिळाल्यानंतर तासगावात सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. पोलिस निरीक्षक संजीवकुमार झाडे, विटा पोलिस निरीक्षक संतोष डोके यांच्यासह तपास पथकाने ते बाळ आईच्या ताब्यात देताना पोलिसांनाही गहिवरून आले होते.

या कारवाईत एलसीबीचे सागर टिंगरे अनिल कोळेकर, संदीप गुरव, विट्याचे प्रशांत सुतार, अमोल जाधव, शशिकांत माळी आणि तासगावचे उपनिरीक्षक संदीप गुरव, नामदेव तरडे, हेडकॉन्स्टेबल सागर लवटे, सोमनाथ गुंडे, अशोक सूर्यवंशी, दत्तात्रय जाधव यांनी सहभाग घेतला.

आधीच केले नियोजन

संशयित महिला विटा येथे राहत होती. एका हॉस्पिटलमध्ये काम करीत होती. काही दिवसांपूर्वी ती विट्यातून येडेमच्छिंद्रला राहायला गेली होती. तिच्या तिसऱ्या नवऱ्याजवळ ती सध्या राहत होती. तिने मूल पळवून नेण्याचे नियोजन करताना आधीच भाड्याची गाडी ठरवून ठेवली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com