बापरे! शिक्षकांचा डाटा खासगी संस्थेला 

संतोष सिरसट 
शनिवार, 21 डिसेंबर 2019

एका संस्थेच्या वतीने शिक्षकांना मूल्यवर्धन उपक्रमाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी त्यांच्या सरल आयडीचा वापर करण्यात आला आहे. तो वापर बेकायदेशीर असल्याचे मत शिक्षकांनी व्यक्त केले. या संकेतस्थळावर शिक्षकांनी त्यांचा स्टाफ आयडी टाकला की त्यांचे प्रमाणपत्र डाऊनलोड होते.

सोलापूर : राज्यातील शिक्षकांना मूल्यवर्धनाचे प्रशिक्षण एका खासगी संस्थेमार्फत दिले आहे. त्याचे प्रमाणपत्र शिक्षकांना मिळण्यासाठी त्या संस्थेने एक लिंक दिली आहे. त्या लिंकवर जाऊन त्याठिकाणी स्टाफ आयडी टाकून ते प्रमाणपत्र घेण्याच्या सूचना शिक्षकांना दिल्या आहेत. स्टाफ आयडी वर राज्यातील प्राथमिकच्या जवळपास सहा लाख 25 हजार शिक्षकांची गोपनीय माहिती आहे. त्यामुळे शिक्षकांची गोपनीय माहिती असलेला हा डाटा खासगी संस्थेला दिलाच कसा असा सवाल विचारत शिक्षकांमध्ये असंतोष पसरला आहे. 

हेही वाचा : ठरलं! सोलापूर "झेडपी'त राष्ट्रवादीचा अध्यक्ष! 
स्टाफचा आयडी कोणी दिला? 

एका संस्थेच्या वतीने शिक्षकांना मूल्यवर्धन उपक्रमाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी त्यांच्या सरल आयडीचा वापर करण्यात आला आहे. तो वापर बेकायदेशीर असल्याचे मत शिक्षकांनी व्यक्त केले. या संकेतस्थळावर शिक्षकांनी त्यांचा स्टाफ आयडी टाकला की त्यांचे प्रमाणपत्र डाऊनलोड होते. मात्र, या संस्थेला शिक्षकांचे स्टाफ आयडी कोणी दिले? हा प्रश्‍न उपस्थित होतो. 
2015 ला सरकारने राज्यातील प्राथमिक व माध्यमिक विभागातील शिक्षकांची व मुलांची माहिती एकत्रित करण्यासाठी सरल व स्टाफ पोर्टलची निर्मिती केली. यावेळी शिक्षकांनी त्यांची वैयक्तिक माहिती या पोर्टलवर भरली आहे. ही माहिती भरल्यावर त्यांना युनिक आयडी ज्याला स्टाफ आयडी म्हणून ओळखले जाते. तो "एनआयसी'कडून देण्यात आला आहे. हा आयडी असलेल्या व्यक्तीला त्या संबंधित शिक्षकांची वैयक्तिक माहिती मिळवता येते. त्यामुळे हा गोपनीय ठेवला जातो. मात्र, शांतिलाल मुथा फाउंडेशनला हे स्टाफ आयडी व शिक्षकांची वैयक्तिक माहिती कोणी दिली? शिक्षकांची वैयक्तिक माहिती अशी एखाद्या खासगी संस्थेकडे कशी काय गेली? असे अनेक प्रश्‍न शिक्षकांमधून विचारले जात आहेत. 

हेही वाचा : पहिल्या सभेच्या परिक्षेत सोलापूरच्या महापौर उतीर्ण 
प्रमाणपत्राची प्रिंट 

शिक्षकांना शासन व त्या संस्थेमार्फत प्रमाणपत्र दिले जाते. त्यासाठी शिक्षकांनी टीचर कोड टाइप करून प्रमाणपत्राची प्रिंट घ्यायची आहे. त्या संस्थेने http://the-octopus.com/api/downloadCertificateForm/Shikshak या लिंकमध्ये स्टाफ आयडी टाकून शिक्षकांना नियुक्तीच्या वेळी जो नंबर दिलेला आहे तो नंबर लिहून ते प्रमाणपत्र डाऊनलोड करण्यास सांगितले आहे. 

माहिती घेतो 
ही प्रक्रिया कशी झाली याची माहिती घ्यावी लागेल. मी सध्या नागपूरला आहे. संबंधित व्यक्तींना बोलावून याबाबत माहिती घेतो. 
- दिनकर पाटील, शिक्षण संचालक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teacher data to a private institution