शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थांची शाळा सुरू करण्याची लगबग 

निरंजन सुतार
Sunday, 22 November 2020

शहरी व ग्रामीण भागातील शिक्षक मुख्याध्यापक व संस्था शाळा सुरू करण्यासाठी सज्ज झाले आहेत. मुख्याध्यापक व शिक्षकांमध्ये उत्साह आहे.

आरग (जि. सांगली) : शालेय शिक्षण विभागाने कोरोना नियमांचे पालन करीत 23 नोव्हेंबर पासून नववी ते बारावीच्या शाळा कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्याच्या सूचना जारी केल्या आहेत.

यासाठी शहरी व ग्रामीण भागातील शिक्षक मुख्याध्यापक व संस्था शाळा सुरू करण्यासाठी सज्ज झाले आहेत. मुख्याध्यापक व शिक्षकांमध्ये उत्साह आहे. मात्र कोरोना संसर्ग अद्यापि कायम असल्याने पालकांमध्ये मात्र हमी पत्र देण्यास संभ्रम कायम आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची चिंता त्यांना सतावत आहे. 

सध्या एक ना अनेक प्रश्नांमुळे पालक वर्ग सध्या चिंतेत आहे. सध्या शाळेत विद्यार्थ्यांना एक दिवसाआड प्रवेश दिला जाणार आहे. शाळेत 50 टक्के तर घरी ऑनलाईन शिक्षणासाठी 50 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती असणार आहे. वर्गात एका बेंच वर एकच विद्यार्थी बसेल. विद्यार्थ्यांना ने-आण करताना पालकांना सोबत यावे लागणार आहे. शाळेची नियमित स्वच्छता व निर्जंतुकीकरण करणे आवश्‍यक आहे.

विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित रहावे

शाळा सुरू करण्यास शिक्षण विभाग सज्ज आहे. साधारणत: 60 टक्के शिक्षकांच्या कोविड 19 टेस्ट झाल्या आहेत. जिल्ह्यातील एकूण दीड लाख विद्यार्थ्यांपैकी 47 हजार विद्यार्थ्यांनी संमती पत्र सादर केले आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी कोरोना नियमांचे पालन करून शाळेत उपस्थित रहावे, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे. 
- सुधाकर तेलंग, माध्यमिक शिक्षणाधिकारी सांगली. 

बैठकीत पालकांनी संमती पत्र दिले

नियमांचे पालन करून सोमवारपासून नियमित वर्ग सुरू होतील. संस्थेच्या स्वखर्चातून वर्गखोल्या, संपूर्ण परिसर निर्जंतुकीकरण केला आहे. शाळेच्या बैठकीत उपस्थित पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी संमती पत्र दिले आहे. 
- दिलीप हुक्कीरे (मुख्याध्यापक, आरग हायस्कूल.) 

परिस्थितीचा आढावा घेऊन मुलांना पाठविण्यात येईल

शाळेकडून अद्याप कोणतीही माहिती पालकांना देण्यात आली नाही. त्यामुळे पालक संभ्रमात आहेत. शाळेला भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेऊन मगच मुलांना शाळेत पाठविण्यात येईल. 
- जावेद शेख ( पालक सांगली ) 

संपादन : युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teachers, headmasters, institutions are about to start a school