शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी कोरोना चाचणी विनाच परतले 

दिलीप क्षीरसागर 
Thursday, 19 November 2020

शिक्षक-शिक्षकेतरांनी प्राथमिक आरोग्य केंद्र व शासकीय रुग्णालयाकडे चाचणी करून घेण्यासाठी धाव घेतली आहे. काही रुग्णालयात पुरेशा टेस्ट किट नसल्याने तपासणी विनाच त्यांना मागे फिरावे लागले. 

कामेरी : जिल्ह्यातील अनुदानित व विनाअनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना "कोरोना चाचणी करा मगच शाळेत हजर रहा' असा आदेश शिक्षण विभागाने दिल्याने शिक्षक-शिक्षकेतरांनी प्राथमिक आरोग्य केंद्र व शासकीय रुग्णालयाकडे चाचणी करून घेण्यासाठी धाव घेतली आहे. काही रुग्णालयात पुरेशा टेस्ट किट नसल्याने तपासणी विनाच त्यांना मागे फिरावे लागले. 

जिल्ह्यातील माध्यमिक उच्च माध्यमिक अनुदानित विनाअनुदानित या शाळा 23 नोव्हेंबरपासून सुरु होत आहेत. पहिला टप्पा म्हणून 9 वी ते 12 वीचे वर्ग सुरु होतील. शाळा सुरू होताना दक्षता म्हणून शासनाने घालून दिलेल्या नियमानुसारच सर्व अंमलबजावणी करण्याचे आदेश शाळा व्यवस्थापनाला आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सर्व शिक्षक व शिक्षकेत्तरांनी 22 नोव्हेंबरअखेर कोविड 19 ची RTPCR करून घेणे अनिवार्य आहे. त्याचा रिपोर्ट 23 नोव्हेंबर रोजी शाळेत येताना आणायचा आहे, अशी सूचना शिक्षण विभागाने केली आहे. ही चाचणी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर प्राथमिक आरोग्य केंद्रे व शासकीय रुग्णालयाकडे धाव घेत आहेत. 

आज काही शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी प्राथमिक आरोग्य केंद्राकडे टेस्टसाठी गेले असता टेस्ट किट पुरेशी उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांना मागे परतावे लागले. काही प्राथमिक आरोग्य केंद्रात "शासनाने आम्हाला तशा काही सूचना केल्या नाहीत' असे कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले. 

वाळवा तालुक्‍यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात दिनांक 18 नोव्हेंबर पासून सकाळी 11 ते 2 या वेळेत कोरना टेस्ट किट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तरी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ही टेस्ट करून घ्यावी. 
- डॉ. साकेत पाटील, तालुका आरोग्य अधिकारी, वाळवा 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teachers, non-teaching staff returned without corona testing