व्वा...! टेंभूच्या पाण्यानं केलीय अशी कमाल

नागेश गायकवाड
सोमवार, 1 जून 2020

भाजीपाला क्षेत्राची वाढ होत चालली आहे. याशिवाय इतर कडधान्याची पिके ही या पाण्याच्या जोरावर घेतली जात आहे. 

आटपाडी (सांगली) - टेंभू योजनेच्या पाण्यातून तालुक्‍यातील सात तलाव भरले असून दोन तलावात सध्या पाणी चालू आहे. याशिवाय तीन ओढ्याला पाणी सोडून ओढ्यावरील पंधरावर बंधारे भरले आहेत. या टेंभूच्या पाण्याचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. टेंभू उपसा सिंचन योजना आटपाडी तालुक्‍याला वरदान ठरली आहे. पारंपरिक शेती करणारे शेतकरी पाणी आल्यामुळे मोठ्या संख्येने द्राक्षबागा लावण्याकडे वळले आहे. डाळिंब क्षेत्रातही वाढ झाली आहे. भाजीपाला क्षेत्राची वाढ होत चालली आहे. याशिवाय इतर कडधान्याची पिके ही या पाण्याच्या जोरावर घेतली जात आहे. 

या वर्षी आटपाडी तालुक्‍यात सात एप्रिलला टेंभू योजनेचे पाणी आले. घाणंद तलाव भरून तेथून कटरेवस्ती पाझर तलाव, मिटकी साठवण तलाव, हिवतड पाझर तलाव, बनपुरी तलाव, शेटफळे येथील रेबाई तलाव आणि दिघंची येथील तलाव टेंभूच्या पाण्याने भरले आहेत. सध्या कचरेवस्ती आणि आटपाडी तलावात पाणी चालू आहे. याशिवाय हिवतड येथून गोमेवाडी, करगणी ओढ्याला पाणी सोडून ओढ्यावरील बंधारे भरले आहेत. काळेवाडीतून ओढ्याला पाणी सोडून काळेवाडी, माळेवाडी, शेटफळे ओढ्यावरील दहावर बंधारे भरलेत. पारेकरवाडीत ओड्यालाही पाणी सोडले आहे.

सध्याच्या मागणीप्रमाणे 15 जूनपर्यंत पाणी चालू ठेवण्याचे नियोजन आहे. अन्य ठिकाणाहून मागणी आल्यास आणि त्या भागात पाणी जात असल्यास टेंभूचे पाणी देण्याचे नियोजन केले जाणार आहे. बंद पाईपलाईनमधून दिघंची तलावात भरला आहे. अन्य भागातील बंद पाईपलाईनची कामे सुरू झाली आहेत. लाकडाउनमुळे कामे बंद होती. तसेच सिमेंट पाईपचा अपुरा पुरवठा होत असल्यामुळे अडचणी येत आहे. ऐन उन्हाळ्यात पाणी सोडल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. द्राक्ष, डाळिंब, सीताफळ या फळ लागवडीत वाढ होत चालली आहे. टेंभूच्या पाण्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. 

टेंभूच्या पाण्याने शेटफळे ओढ्यावरील बंधारे भरून दिले. त्यामुळे डाळिंबाच्या बागा धरल्या तसेच इतर पीक आहे केली आहे- 

- प्रकाश गायकवाड, (शेतकरी शेटफळे) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tembhu project seven lakes overflow sangli district