कुठे हरवली मूळ त्र्यंबोली टेकडी?

सुधाकर काशीद 
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

शुद्ध हवेसाठी निसर्गदत्त देणगी म्हणजे त्र्यंबोली टेकडी. सध्या मात्र या टेकडीची दुरवस्था आहे. येत्या शनिवारी (ता. २३) ‘सकाळ’, महापालिका, देवस्थान समिती, त्र्यंबोली हक्कदार पुजारी, त्र्यंबोली परिसरातील रहिवासी व कोल्हापूरकरांतर्फे त्र्यंबोली टेकडीवर श्रमदान स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यानिमित्त टेकडीच्या इतिहासाचा हा मागोवा...

कोल्हापूर - शहराच्या पूर्वेस ही टेकडी आहे. सूर्य उगवला, की सूर्याची किरणे या टेकडीवरील त्र्यंबोली देवीला स्पर्श करून पुढे कोल्हापूर शहरावर पसरतात. म्हणून या टेकडीला एक उंच धार्मिक अधिष्ठान आहे. या टेकडीवर स्वातंत्र्यपूर्व काळात राजाराम बटालियन, जी बटालियन पुढे मराठा लाइट इन्फन्ट्री म्हणून ओळखली जाऊ लागली, या बटालियनचे जवान शौर्य गाजवू लागले; म्हणून या टेकडीला शौर्याची परंपरा आहे. 

या टेकडीवरच फक्त झुळझुळणारी शुद्ध हवा मिळे, त्यामुळे या टेकडीजवळच स्वातंत्र्यपूर्व काळात क्षयरोग उपचार केंद्र होते. म्हणून या टेकडीला कोल्हापूरच्या आरोग्यात महत्त्वाचे स्थान आहे; पण या टेकडीचे महत्त्वच आपण कोल्हापूरकर विसरून गेलो आहोत, अशी आताची स्थिती आहे आणि आताच आपण कोल्हापूरकरांनी या टेकडीला वाचवायचं ठरवलं नाही; तर ‘कुठे गेली ती त्र्यंबोली टेकडी,’ असे विचारायची वेळ नव्या पिढीवर येणार आहे. 

कोल्हापूरच्या पूर्वेला त्र्यंबोली, पश्‍चिमेला चंबुखडी, दक्षिणेला पुईखडी व उत्तरेला सादळे-मादळे अशा चार टेकड्या. या टेकड्या म्हणजे निसर्गाने कोल्हापूरकरांना दिलेले वरदान. यांपैकी त्र्यंबोली टेकडीला मोठे धार्मिक अधिष्ठान. आता या एका टेकडीवर मंदिर आहे. लगतच्या टेकडीवर प्रादेशिक सेना दल, त्या लगतच्याच टेकडीवर विक्रमसिंह पाणी टाकी आहे. म्हणजेच त्र्यंबोली टेकडी म्हणजे तीन टेकड्यांचा समूह आहे. 

एका टेकडीवर मंदिर म्हणजे धार्मिक परंपरा; तर लगतच्या दुसऱ्या टेकडीवर प्रादेशिक सेना दल म्हणजे शौर्याची परंपरा. या टेकडीवर पूर्वी संस्थानकाळात राजाराम बटालियन म्हणजे करवीर संस्थानचे सैन्यतळ होते. या टेकडीला क्‍लॉड हिल असेही म्हणत. शाहू महाराजांनी त्यांचे मित्र क्‍लॉड यांचे नाव या टेकडीला दिले होते असे सांगितले जाते. 

तिसऱ्या टेकडीवर विक्रमसिंह यांच्या नावाने शहरास पाणीपुरवठा करणारी पाण्याची टाकी. हे विक्रमसिंह म्हणजे शाहू महाराजांच्या कन्या आक्कासाहेब महाराज यांचे चिरंजीव. त्यांना कोल्हापूर संस्थानात दत्तक घेतल्यावर त्यांचे नाव शहाजीराजे झाले; पण विक्रमसिंह या नावाने टेकडीवर विक्रमनगर वसले गेले. 

त्र्यंबोली टेकडीवर नवरात्रात देवीची मोठी यात्रा भरते; तर शेजारच्या टेकडीवर लष्करात भरती होण्यासाठी मराठमोळ्या तरुणांची जत्रा फुलते. भन्नाट वारा, स्वच्छ हवा, यामुळे या टेकड्या म्हणजे पर्यावरणाचा वारसा आहेत; पण या टेकड्यांचे महत्त्व काळाच्या ओघात हरवले आहे. टेकडीचे महत्त्व सांगणारी आणि ऐकणारी पिढी नाहीशी झाली आहे. स्वच्छ परिसर आणि स्वच्छ हवेचा खजिना असलेल्या टेकडीला अस्वच्छतेने घेरले आहे. ‘आव-जाव घर तुम्हारा’ अशी या टेकडीची अवस्था झाली आहे. त्यामुळे या टेकडीवर यापूर्वी झुळझुळत येणारे वारेही दबकत दबकत येत आहे. टेकडीवर शुद्ध हवा घेण्यासाठी येणाऱ्यांना अस्वच्छता अनुभवायला लागत आहे. कोणत्याही शहराला नसेल अशी नैसर्गिक देणगी या टेकडीने कोल्हापूरला दिली आहे; पण आपण या टेकडीला जपणार आहोत की नाही हाच, खरा प्रश्‍न आहे. 

बॅंड स्टॅंड 
या टेकडीवर बॅंड स्टॅंड होते. तेथे लष्करी वाद्यवृंदाचे सादरीकरण केले जात होते. या बॅंड स्टॅंडचे छत काळाच्या ओघात कोसळले. त्याच बॅंड स्टॅंडच्या चौथऱ्यावर आता भव्य गणेशमूर्ती आहे. शेजारी छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा आहे. टेकडीचे सुशोभीकरण करण्यासाठी उभारलेल्या सिमेंट मूर्ती भग्न झाल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Temblai hill cleanliness campaign Kolhapur Sakal Event