सोन्यावाल्यांना येणार सोन्याचे दिवस, पुढच्या वर्षी होणार लाख रूपये तोळा

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 25 April 2020

दहा वर्षांपूर्वी भारतात तोळ्याला ८ ते ९ हजार रूपयांचा भाव होता. मात्र, सोन्याचे दर किती आहेत, हे प्रत्येकाला माहिती आहे. लॉकडाऊनच्या काळात बहुतांशी व्यवसायाची वाट लागली आहे. मात्र, सोन्यातील गुंतवणूक वाढते आहे.

नगर - जगात गुंतवणुकीचे अनेक प्रकार आहेत. स्टॉक मार्केटपासून बिटक्वॉईनपर्यंत अनेकानेक प्रकार लोकांना आता ठाऊक आहेत. मात्र, ग्रामीण भागात आजही सोन्यातील गुंतवणुकीलाच प्राधान्य दिलं जाते. त्यामुळे लग्नातील बोलणीही पैशापेक्षा तोळ्याताच होतात. कोणत्या नवरीला किती तोळे अंगावर घातले यावरच श्रीमंती मोजण्याची रिवाज आहे. सोन्यापेक्षा प्लॅटिनम महाग असले तरी सोन्याची क्रेझ काही कमी झालेली नाही.

गुरूपुष्यामृत योगाला किंवा साडेतीन मुहूर्ताला सोन्याची खरेदी करणाऱ्यांची संख्या कमी नाही. सोन्याचा भाव गेल्या काही दशकांत चढाच आहे. त्यामुळे इतर लोकांनीही सोन्यात रस दाखवला आहे. सोनं घेतलं की त्याचं सोनंच होतं, असं ग्रामीण भागातील जुनीजानती मंडळी सांगतात. अर्थात ती अर्थतज्ज्ञ नसली तरी अनुभवावर त्यांचे हे निरीक्षण आहे.

दहा वर्षांपूर्वी भारतात तोळ्याला ८ ते ९ हजार रूपयांचा भाव होता. मात्र, सोन्याचे दर किती आहेत, हे प्रत्येकाला माहिती आहे. लॉकडाऊनच्या काळात बहुतांशी व्यवसायाची वाट लागली आहे. मात्र, सोन्यातील गुंतवणूक वाढते आहे. अक्षय्यतृतीयेला सोन्याची खरेदी केली जाते. काल प्रत्येक तोळ्याला १ हजार १०० रूपयांनी वाढ होऊन सोन्याचे दर ४६ हजार ७०० रूपये झाले. चांदीचा प्रतिकिलोचा भाव ४२ हजार १०० रूपये आहे. चांदीच्या भावात थोडी घसरण झाल्याचे पहायला मिळते.

हेही वाचा - मोदीजी लाईन पे है...चंद्रशेखरजी बोल रहे है क्या

सध्या डॉलरचा भाव ७६.३४ आहे. सध्या कमोडिटी मार्केट सुरू आहे. त्यात सोन्याच्या भावात वाढ होताना दिसते.  जगभरात सोन्यात गुंतवणूक होते आहे. न्यूयॉर्कमध्ये सोन्याचे दर २.०९ टक्क्यांनी वाढले आहेत. आता ते १ हजार ७२३ डॉलर प्रति औंस झाले आहेत.

लवकरच सोन्याचे दर आभाळाला टेकतील. ज्याच्याकडे सोने आहे, त्याला सोन्याचे दिवस येणार आहेत. सध्या ४६ हजार रूपये सोन्याचा प्रतितोळा दर आहे. भविष्यात तो दुप्पट होणार आहे.हा काळ फार लांब नाही तर अगदी पुढच्याच वर्षी सोने ९० हजार रूपये तोळा विकले जाऊ शकते. हा अंदाज दुसऱ्या-तिसऱ्या कोणी नाही तर बँक अॉफ सिक्युरिटच्या विश्लेषकांनी वर्तवला आहे.

गेल्या वर्षांतील सोन्याचा चढता आलेख आणि सध्याची जागतिक मंदी पाहता सोने नव्वदीकडे जाऊ शकते असे एका सराफी पिढीच्या संचालकाने सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ten grams of gold will cost 1 lakh